सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांना माहीम येथील रहेजा फोर्टिस रुग्णालायत दाखल करण्यात आले आहे. उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. आज त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मुख्यमंत्र्यांशी त्यांची भेट होऊ शकली नव्हती. त्यानंतर एका वाहिनीवर चर्चासत्रात बोलत असतानाच त्यांना त्रास जाणवू लागला, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
काँग्रेसच्या सेवा दलाने छापलेल्या एका पुस्तिकेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांना समलिंगी संबोधल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. या पुस्तकावर बंदी आणून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी रणजित सावरकर यांनी लावून धरली आहे. त्यासंबंधी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचाही प्रयत्न केला. मात्र काही कारणास्तव त्यांना भेट मिळाली नाही. त्यानंतर रणजित सावरकर यांनी आपले लेखी निवेदन मुख्यमंत्री कार्यालयाकडे सुपुर्द केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्याला भेटण्यासाठी एक मिनिट देखील नाही का? असा प्रश्न उपस्थित करत हा माझा नाही तर सावरकरांचा अपमान असल्याचे रणजित सावरकर म्हणाले होते.