घरमुंबईनायर रूग्णालयामुळे 'तिचं' सौभाग्य आणि मातृत्व वाचले!!

नायर रूग्णालयामुळे ‘तिचं’ सौभाग्य आणि मातृत्व वाचले!!

Subscribe

मरणाच्या दारात असलेल्या पितापुत्रांवर मुंबईच्या नायर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी यशस्वी उपचार करून प्रियांका जाधव यांचे मातृत्त्व व सौभाग्य वाचवत त्यांच्या जीवनात हास्य फुलवले.

मानवी शरीरातील मेंदू व मज्जारज्जू यांना जोडणार्‍या व्यवस्थेत बिघाड झाल्याने त्याचे मानेखालील अंग लुळे पडत चालले होते. श्वास घ्यायलाही त्रास होत होता. अन्य मुलांप्रमाणे तो खेळत नव्हता. त्याची हालचाल होत नव्हती. आपल्या सहा वर्षीय मुलाची ही अवस्था पाहून मंगेश जाधव यांना धक्काच बसला आणि ब्रेनस्ट्रोक आला. मरणाच्या दारात असलेल्या पितापुत्रांवर मुंबईच्या नायर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी यशस्वी उपचार करून प्रियांका जाधव यांचे मातृत्त्व व सौभाग्य वाचवत त्यांच्या जीवनात हास्य फुलवले.

tanay father
तनयचे वडील मंगेश जाधव

वाळकेश्वर येथे राहणारे मंगेश जाधव (वय ४२) महापालिकेच्या हँगिंग गार्डनमध्ये माळी म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा मुलगा तनयला जानेवारीपासून अचानक त्रास जाणवू लागला. तो सतत जमिनीवर लोळत असे, बसण्याची व उभे राहण्याची त्याची क्षमता कमी झाली होती. तो इतर मुलांप्रमाणेे खेळत नसे. तसेच त्याला श्वास घेण्यासही त्रास व्हायचा. त्याच्या वयाची मुले खेळत होती, शाळेत जात होती; पण तनयचे शरीर जवळपास लुळे पडले होते. त्याला लगेच दमही लागत होता. तनयला आईवडिलांनी खासगी डॉक्टरांकडे नेले. त्यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास सांगितले. त्यामुळे मंगेश व त्यांची पत्नी प्रियंका यांनी तनयला मुंबई सेंट्रल येथील पालिकेच्या नायर हॉस्पिटलमध्ये आणले. तनयचे सीटी स्कॅन व एमआरआय केल्यानंतर त्याला ‘सीव्हीजे अ‍ॅनॉमोली अ‍ॅटलांटो एक्झिएल डिसलोकेशन’ हा आजार म्हणजेच त्याच्या मेंदू व मज्जारज्जूंना जोडणार्‍या व्यवस्थेवर दबाव येत असल्याचे निदर्शनास आले. मज्जारज्जूवर येत असलेल्या दबावामुळे त्याच्या शरीरावरील नियंत्रण कमी होऊन त्याचे शरीर हळूहळू लुळे पडत होते. तसेच त्याला श्वासोच्छवास करण्यासही त्रास होत होता.

- Advertisement -

‘सीव्हीजे अ‍ॅनॉमोली अ‍ॅटलांटो एक्झिएल डिसलोकेशन’ हा आजार दुर्मिळ प्रकारात मोडणारा आहे. यावर करण्यात येणारी ‘सी1सी2 फ्युजन’ ही किचकट व अवघड प्रकारातील शस्त्रक्रिया समजली जाते. शस्त्रक्रियेदरम्यान रुग्ण दगावण्याची शक्यता असल्याने बहुतांश डॉक्टर ही शस्त्रक्रिया करण्यास तयार होत नाहीत. त्यात लहान मुले असल्यावर धोका अधिक असतो. परंतु नायर हॉस्पिटलमधील न्यूरो सर्जरी विभागाचे प्रमुख व प्राध्यापक डॉ. त्रिमुर्ती नाडकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक प्राध्यापक डॉ. श्रीकांत बालसुब्रह्मण्यम यांनी डॉ. पांडुरंग बर्वे यांच्या मदतीने ही अवघड शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेत तनयला नवे जीवन दिलेे.

27 जूनला तनयवर तब्बल पाच तास शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेत तनयच्या ‘सी1व सी2’ या मणक्यांमध्ये स्क्रु व रॉड टाकून मणक्यांमधील अंतर वाढवून मज्जारज्जूवर येणारा दबाव कमी करण्यात आला. या शस्त्रक्रियेसाठी साधारण 15 लाख इतका खर्च येतो. परंतु पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली. शस्त्रक्रिया केल्यानंतर काही दिवसांतच तनयच्या प्रकृतीत सुधारणा झाली. तो आपले हात-पाय हलवू लागला. इतकेच नव्हे तर हाताने तो इशारा करणे, चित्र रंगवणे, बाराखडी लिहिणे अशा गोष्टी सहजपणे करू लागला. त्याचे शरीर उपचाराला प्रतिसाद देत असून, श्वास घेण्यास होत असलेला त्रासही हळूहळू कमी होत असला तरी सध्या त्याला व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. आणखी १० ते १५ दिवसांनी त्याला घरी सोडण्यात येईल, अशी माहिती डॉ. श्रीकांत बालसुब्रह्मण्यम यांनी दिली.

वडिलांना ब्रेनस्ट्रोक
तनयला झालेला आजार दुर्मिळ असून, त्याच्यावर करण्यात येणारी शस्त्रक्रिया किचकट व अवघड प्रकारातील असल्याचे समजल्यावर त्याचे वडील मंगेश यशवंत जाधव (वय 42) यांना धक्काच बसला. यामुळे त्यांना ब्रेनस्ट्रोक आला. परंतु त्यावेळी मंगेश हे हॉस्पिटलमध्येच असल्याने नायरमधील डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार केले. मंगेश जाधव यांच्यावर दोन तासांतच उपचार झाल्याने त्यांचे प्राण वाचल्याचे डॉ. पांडुरंग बर्वे यांनी सांगितले.

‘सी1सी2 फ्युजन’ ही शस्त्रक्रिया फारच दुर्मीळ, किचकट व अवघड समजली जाते. लहान मुलांमध्ये शस्त्रक्रिया करताना धोका अधिक असतो. शस्त्रक्रियेदरम्यान रुग्ण दगावण्याची शक्यता अधिक असतो. त्यामुळे लहान मुलांमध्ये ही शस्त्रक्रिया केली जात नाही. ही शस्त्रक्रिया करण्याचे धाडस मोजकेच न्यूरो सर्जन करतात. माझ्या टीममधील डॉक्टरांनी केलेले धाडस कौतुकास्पद आहे.
– डॉ. त्रिमुर्ती नाडकर्णी, प्राध्यापक व विभाग प्रमुख, न्यूरोलॉजी विभाग.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -