घरताज्या घडामोडी...म्हणून रश्मी ठाकरेंनी घेतली 'सामना'च्या संपादकपदाची सूत्रं!

…म्हणून रश्मी ठाकरेंनी घेतली ‘सामना’च्या संपादकपदाची सूत्रं!

Subscribe

सामनाच्या संपादकपदाची धुरा उद्धव ठाकरेंनी पद सोडल्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून अप्रत्यक्षपणे कार्यकारी संपादक संजय राऊतच सांभाळत होते. आता सामनाच्या संपादकपदाची जबाबदारी रश्मी ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

गेल्यी तीन दशकांहून जास्त काळ शिवसेनेचं मुखपत्र म्हणून महाराष्ट्रभर पक्षाची भूमिका समर्थपणे मांडणाऱ्या ‘दै. सामना’ला पहिल्यांदाच महिला संपादक लाभल्या आहेत. २३ जानेवारी १९८८ रोजी सामना सुरू झाल्यापासून ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या निधनापर्यंत स्वत: बाळासाहेबच सामनाचे संपादक होते. त्यानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्र हाती घेतलेले उद्धव ठाकरे सामनाचे संपादक झाले. आणि आता उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्नुषा रश्मी ठाकरे या सामनाच्या संपादक झाल्या आहेत. आजपासूनच म्हणजे १ मार्च २०२०पासून रश्मी ठाकरे या सामनाच्या संपादकपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. त्यामुळे सामनाचं संपादकपद ठाकरे घराण्याकडेच कायम राहिलं आहे. मात्र, असं असलं तरी सुरुवातीपासून संजय राऊत हेच सामनाचे कार्यकारी संपादक राहिले असून अजूनही तेच या पदावर कायम आहेत.

उद्धव ठाकरेंनी का सोडलं संपादकपद?

राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेईपर्यंत सामनाचे संपादक होते. मात्र, २८ नोव्हेंबर २०१९ रोजी उद्धव ठाकरेंचा शपथविधी झाला आणि त्यांनी सामनाचं संपादकपद सोडलं. सामनाचं संपादकपद हे लाभाचं पद असल्यामुळे मुख्यमंत्री असताना हे पद भूषवणं उद्धव ठाकरेंसाठी अडचणीचं ठरलं असतं. या पार्श्वभूमीवर त्यांनी संपादकपद सोडलं होतं. मात्र, त्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून संजय राऊत यांच्यावरच सामनाची सर्व जबाबदारी होती. आता मात्र सामना वर्तमानपत्राच्या क्रेडिट लाईनमध्ये संपादक म्हणून रश्मी ठाकरे यांचं नाव झळकलं आहे.

- Advertisement -

सामना आणि सत्तास्थापना!

विधानसभा निवडणुका झाल्यानंतर राज्याच निर्माण झालेल्या राजकीय पेचामध्ये सामनाने संपादकीयामधून भाजपवर परखड टीका केली होती. तसेच, सत्तास्थापनेसंदर्भातल्या वाटाघाटींमध्ये शिवसेनेची भूमिका काय असेल, हे सामनाने संपादकीयामधून वेळोवेळी मांडलं होतं. खुद्द माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राजीनामा दिल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सामनाच्या संपादकीयातून होणाऱ्या बोचऱ्या टीकेवर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे राज्यातल्या सत्तास्थापनेमध्ये ‘सामना’ची देखील तितकीच महत्त्वाची भूमिका राहिली होती. त्या पार्श्वभूमीवर सामनाचं संपादकपद ही महत्त्वाची जबाबदारी आता रश्मी ठाकरेंवर सोपवण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -