फडणवीसांची डिग्री तपासण्यापेक्षा संजय राऊत पत्रकार आहेत का हे तपासलं पाहिजे – नितेश राणे

Saamna newspaper, the task of setting fire to the Pawar family Nitesh Rane

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निकाल दिला असून १६ आमदार पात्र की अपात्र याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर घ्यावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिले आहेत. परंतु यानंतर राजकीय वर्तुळात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. संजय राऊत यांनी फडणवीसांची डिग्री तपासायला पाहिजे, असे विधान केले होते. या विधानाला भाजपाचे आमदार नितेश राणे (Nitest Rane) यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, फडणवीसांची डिग्री तपासण्यापेक्षा संजय राऊत पत्रकार आहेस का हे पहिलं तपासलं पाहिजे.

मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी उद्धव ठाकरे यांची गुरुवारी मातोश्रीवर भेट घेतली. या भेटीवर बोलताना नितेश राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे नितिमत्ता आणि नैतिकतेची भाषा करतात, पण ते स्वत:चा आत्मा, स्वत:चा धर्म विकून महाराष्ट्राशी आणि हिंदुत्वाशी बेईमानी करत आहेत. लालु प्रसाद यांनी राम मंदिरारासाठी निघालेल्या रथ यात्रेला विरोध केला, रथ अडवला. त्यांच्याबद्दल हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सामनामध्ये असंख्य अग्रलेख लिहिले आहेत. ते अग्रलेख संजय राऊत यांनी वाचून दाखवावे. नितिमत्ता आणि नैतिकतेची भाषा सांगण्यापेक्षा आधी आमदारकी सोडून दाखवा मग मुख्यमंत्री पदाची चर्चा करा, असा टोला नितेश राणे उद्धव ठाकरेंना लगावला.

नितेश राणे म्हणाले की, संजय राऊत नैतिकतेची भाषा करतात, पण त्यांच्यामध्ये थोडी पण नैतिकता असेल तर ज्या शिवसेना आमदाराच्या मतांवर खासदार झाले आहेत त्या खासदारकीचा पहिला संजय राऊत यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि सांगितले पाहिजे माझ्यामध्ये नैतिकता उरली आहे, मला नको अशी खासदारकी. संजय राऊत शिंदे गटाला गद्दार म्हणतात, पण एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी दिलेली खासदारकी त्यांना चालते, पण शिंदे आणि त्यांचे आमदार चालत नाही. जर संजय राऊत यांच्यात खरच हिंमत असेल तर त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला पाहिजे आणि पुन्हा खासदार म्हणून निवडून यायला पाहिजे. त्यानंतर नितिमत्ता आणि नैतिकतेची भाषा केली पाहिजे, असे नितेश राणे म्हणाले.

फडणवीसांची डिग्री तपासण्यापेक्षा पत्रकार आहेस का हे तपासलं पाहिजे
संजय राऊत यांच्यावर रोज महाविकास आघाडीचे लोक टीका करत आहेत आणि संजय राऊत म्हणतात उगाच पेढे वाटले. पण संजय राऊत यांच्यापेक्षा जास्त कायदा राहुल नार्वेकर आणि देवेंद्र फडणवीस यांना कळतो. संजय राऊत यांना कायद्याबद्दलच माहिती नाही आणि त्यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णयसुद्धा अजून कळलेला नाही. त्यांना फक्त रशियन भाषेमध्ये नुसतं नंगा नाच काय असतो एवढेच कळते. संजय म्हणतात फडणवीसांची डिग्री तपासायला पाहिजे., पण मुळात संजय राऊत पत्रकार आहे काय? हे आधी तपासलं पाहिजे, अशी खोचक टीका नितेश राणे यांनी केली.