घरठाणेएकनाथ शिंदेंकडून पुनर्नियुक्तीचा सपाटा; शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुखपदी नरेश म्हस्के यांची नियुक्ती

एकनाथ शिंदेंकडून पुनर्नियुक्तीचा सपाटा; शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुखपदी नरेश म्हस्के यांची नियुक्ती

Subscribe

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निर्णय अमान्य

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संघटनेतील पदावरून हकालपट्टी केलेल्या पदाधिकार्‍यांची पुनर्नियुक्ती करण्याचा सपाटा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लावला आहे. सामनातून झालेली हकालपट्टी बेकायदा ठरवत शिंदे यांनी नरेश म्हस्के यांची शिवसेनेच्या ठाणे जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती कायम ठेवली आहे. याआधी शिंदे यांनी हिंगोली जिल्ह्यातील आमदार संतोष बांगर यांची नियुक्ती कायम असल्याचे स्पष्ट केले होते.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ नरेश म्हस्के यांनी शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर म्हस्के यांची या पदावरून हकालपट्टी करीत असल्याचे सामना दैनिकातून जाहीर करण्यात आले होते, मात्र ही हकालपट्टी बेकायदेशीर ठरवून धुडकावण्यात आली आहे.

- Advertisement -

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय आनंद दिघे यांच्या हिंदुत्ववादी विचारांचा ध्वज हाती घेणार्‍या कट्टर शिवसैनिकाला पदावरून हटविण्याचे अधिकार ‘सामना’ला नाहीत , असे स्पष्ट करीत जिल्हाप्रमुखपदी नव्या जोमाने काम करण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी नरेश म्हस्के यांना दिले आहेत.

गुरुवारी रात्री म्हस्के यांनी एकनाथ शिंदे यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी जिल्हाप्रमुखपदाची सूत्रे पुन्हा म्हस्के यांच्या हाती सोपविताना ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील पक्ष विस्ताराच्या मोहिमेबाबत शिंदे यांनी त्यांना मार्गदर्शन केले. आजपर्यंत मनमानी पद्धतीने हकालपट्टी केलेल्या शिवसेनेच्या सर्व पदाधिकार्‍यांची पुन्हा त्याच पदांवर पुनर्नियुक्ती करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

- Advertisement -

आपल्याला ज्यांनी ज्यांनी साथ दिली त्या सगळ्यांवर पक्ष नेतृत्वाने तडकाफडकी कारवाई सुरू केली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली जात आहे, परंतु शिवसेनेची स्थापना करताना बाळासाहेबांनी जो विचार मांडला होता तोच विचार आपण पुढे घेऊन जात आहोत. खरी शिवसेना आपल्यासोबतच आहे. त्यामुळेच दैनिक सामना किंवा शिवसेनेच्या विचारांपासून दुरावलेल्या कोणत्याही नेत्याने काढलेले आदेश जुमानायचे नाहीत, असे शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

तडकाफडकी पक्षातून काढणे बेकायदेशीर
शिवसेनेच्या घटनेनुसार कोणत्याही पदाधिकार्‍याला त्याच म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय तडकाफडकी पक्षातून काढून टाकणे हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. त्यासाठी त्या पदाधिकार्‍याला रीतसर नोटीस देऊन त्याचे म्हणणे मांडण्याची संधी द्यावी लागते, मात्र अशा कोणत्याही प्रक्रियेचा अवलंब नरेश म्हस्के यांना पदावरून काढताना अनुसरण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यांची हकालपट्टी बेकायदेशीर ठरत असून त्यांची पुन्हा त्याच पदावर पुनर्नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -