घरमुंबई#AareyForest : रात्रीस खेळ चाले!

#AareyForest : रात्रीस खेळ चाले!

Subscribe

आरे कॉलनीत शुक्रवारी रात्री झाडे कापताना काही पुनर्रोपित झाडेही कापली गेली असून ही सर्व झाडे वृक्ष तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाशिवायच कापली गेल्याचेही बोलले जात आहे.

मेट्रो कारशेडच्या बांधकामामध्ये बाधित होणार्‍या आरे दुग्ध वसाहतीच्या जागेतील झाडे कापण्यास वृक्ष प्राधिकरणाने मंजुरी दिल्यानंतर, न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवताच शुक्रवारी संध्याकाळी येथील सर्व झाडांवर कटर चालवत कापून टाकण्यात आली. मात्र, ही झाडे कापताना काही पुनर्रोपित झाडेही कापली गेल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पुनर्रोपित झाडेही कापल्यामुळे मुंबई मेट्रो अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही सर्व झाडे वृक्ष तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाशिवायच कापली गेल्याचेही बोलले जात आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

आरे वसाहत येथील मेट्रो रेल्वे ३ प्रकल्पांतर्गत मेट्रो कार डेपोच्या प्रस्तावित बांधकामात अडथळा करणारी २ हजार २३८ झाडे कापण्यास आणि ४६४ झाडे पुनर्रोपित करण्यास तसेच ९८९ झाडे आहेत तशीच ठेवण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने २१ जुलै २०१७ रोजी प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाला सादर केला होता. त्यानंतर या प्रस्तावावर मागील महिन्यात याला मंजुरी देण्यात आल्यानंतर याविरोधात पर्यावरण संस्थेसह स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे झाडे कापण्यास दिलेल्या परवानगीला स्थगिती देण्यात आली होती. परंतु शुक्रवारी झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती उठवताच मुंबई मेट्रोने संध्याकाळी आणि रात्रीच्या अंधारात यांत्रिक पध्दतीने ही झाडे कापली.

- Advertisement -

हेही वाचा – आरेतील झाडांच्या खुन्यांना सत्तेत आल्यानंतर बघू – उद्धव ठाकरे

वृक्ष प्राधिकरणाने परवानगी दिलेल्या प्रस्तावामध्ये ४६४ झाडे ही पुनर्रोपित करायची होती. परंतु शुक्रवारी अत्यंत हातघाईवर आलेल्या मुंबई मेट्रोने या भागातील सरसकट सर्वच झाडांची कटाई करण्यात आली. त्यामुळे पुनर्रोपित झाडेही यामध्ये कापली गेल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. जी झाडे कापली जाणार होती, त्यातीलच काही झाडे ही पुनर्रोपित केली जाणार होती. परंतु, रात्रीच्या अंधारात झाडे कापताना पुनर्रोपित झाडांचा विचार न करता सरसकट झाडे तोडण्यात आली आल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

मेट्रोच्या अंदाधुंदी कारभारामुळे आरर्बोरिस्टही गेला सोडून

मेट्रोच्या बांधकामांमध्ये बाधित होणारी झाडे शास्त्रोक्तपणे कापण्यासाठी तसेच शास्त्रोक्तपणे ती झाडे पुनर्रोपित करण्यासाठी एमएमसीएलने वैभव राजे यांची नियुक्ती केली होती. वैभव राजे हा एकमेव आरर्बोरिस्ट असून मुंबई मेट्रोने यांची नियुक्ती करत आपण झाडांसाठी त्यांची निवड केल्याचे दाखवले होते. परंतु, झाडांच्या बाबत मुंबई मेट्रोच्या अधिकार्‍यांकडून घेतल्या जाणार्‍या अंदाधुंद कारभाराला कंटाळून राजे यांनी मेट्रोलाच रामराम ठोकला. त्यामुळे सध्या मुंबई मेट्रोकडे कोणीही वृक्ष तज्ज्ञ नाही. त्यामुळे झाडांची योग्यप्रकारे देखभाल किंवा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली झाडे कापली जात नसल्याने हा प्रकार झाल्याचेही बोलले जात आहे.

रात्रीच्या वेळी झाडे कापण्यास परवानगी कुणी दिली? – स्थायी समितीचा सवाल

न्यायालयाने स्थगिती उठवताच रात्रीच्या अंधारात आरेतील झाडे मेट्रो प्रकल्पासाठी कापण्यात आल्याने स्थायी समितीत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. वृक्ष प्राधिकरणाने झाडे कापण्यास परवागी दिली असली तरी रात्रीच्या वेळी झाडे कापण्याची त्यात तरतूद कुठे? असा सवाल करत अशाप्रकारे झाडे कापल्यामुळे मेट्रोची भूमिका संशयाच्या भोवर्‍यात सापडली असल्याचा आरोप स्थायी समितीने केला.

हेही वाचा – गनिमी कावा करत आरेमध्ये घुसलेल्या जितेंद्र आव्हाडांना अटक

आरेतील झाडे रात्रीच्या अंधारात कापल्यामुळे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी याबाबत स्थायीत माहिती देण्याची मागणी केली. यावर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी रात्रीच्या अंधारात झाडे कापण्याची परवानगी कुणी दिली असा सवाल करत मेट्रोच्या कामांवर शंका उपस्थित केली. तर रात्रीच्या वेळी झाडे कापणे भुषणावह नसल्याचे सांगत रात्रीच्या वेळी झाडे कापणार्‍यांवर वॉच ठेवणारी महापालिकाच आता रात्री झाडे कापू लागली तर कुणाला दोष द्यायचा? असा सवाल सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी केला. यावर अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी रात्रीच्या वेळी झाडे कापू नये, तरीही प्राधिकरणाने परवानगी काय दिली आहे तपासून त्याचा अहवाल समितीला सादर केला जाईल,असे आश्वासन दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -