घरताज्या घडामोडीलोअर परळच्या पुलाचे काम लवकरच; गुजरातची कंपनी बांधणार पूल

लोअर परळच्या पुलाचे काम लवकरच; गुजरातची कंपनी बांधणार पूल

Subscribe

लोअर परळ रेल्वे स्थानकाजवळील धोकादायक पूल दीड वर्षांपूर्वी वाहतुकीसाठी बंद करून पाडण्यात आल्यानतंर याठिकाणी नव्याने पूल बांधणीच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. या पुलाच्या बांधकामासाठी महापालिकेच्यावतीने कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आलेली असून यावर तब्बल १३८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. विशेष म्हणजे गुजरातचा कंत्राटदार या पुलाची बांधणी करणार आहे.

अंधेरी येथील रेल्वे स्थानकावरील गोपाळकृष्ण गोखले पुलाचा काही भाग कोसळल्यानंतर मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकावरील पुलांचा सर्वे करण्यात आला. या पुलांच्या पाहणीमध्ये आयआयटी मुंबईच्या चमुने लोअर परळमधील डीलाईल पूल धोकादायक स्थितीत असल्याचे आढळून आले. त्यानुसार २४ जुलै २०१८ पासून हे पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. पूल बंद करण्यात आल्यानंतर पश्चिम रेल्वेने रेल्वे हद्दीतील पुलांच्या पाडकामांसाठी कंत्राटदाराची नेमणूक केली. त्यानुसार रेल्वे हद्दीतील पुलाच्या बांधकामासाठी सुुरुवात झालेली आहे. या रेल्वे हद्दीतील पुलाच्या बांधकामासाठी रेल्वे प्रशासनाने १२५ कोटी रुपयांची मागणी केली आहे. त्यानुसार महापालिकेने रेल्वे प्रशासनाला २५ कोटी १६ लाख रुपयांचे अधिदान दिले आहे. रेल्वेचे हे काम नोव्हेंबर २०२०पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

- Advertisement -

परंतु रेल्वेच्या हद्दीतील या पुलांच्या बांधकामाबरोबरच महापालिकेच्या हद्दीतील गणपतराव कदम मार्ग व ना. म. जोशी मार्गावरील उत्तर बाजुला असलेल्या पुलाचे पाडकाम करून पुलाच्या पुनर्बांधणी करणे आवश्यक आहे. मात्र, पुलाच्या दक्षिण पूर्व बाजुस म्हणजेच करीरोडच्या बाजुला असलेल्या पुलाच्या काम हे रेल्वेला गर्डर बसवण्यासाठी आवश्यक असल्याने रेल्वेचे काम पूर्ण झाल्यानंतरच करीरोडच्या बाजुच्या पुलाचे काम करता येईल,असे पूल विभागाने स्पष्ट केले.
सल्लागारांच्या आरखड्यानुसार, मागवलेल्या निविदांमध्ये तीन कंपन्यांनी सहभाग दर्शवला. यामध्ये जीएचव्ही इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पात्र ठरली आहे. महापालिकेच्या अंदाजित रकमेच्या चार टक्के अधिक दराने बोली लावत या कंपनीने ९९ कोटी ७४ लाख रुपयांचे कंत्राट मिळवले आहे. त्यामुळे विविध करांसहित तसेच सल्लागार शुल्कांसह या पुलांच्या बांधकामांसाठी १३८ कोटी रुपये खर्च होणार आहे.

या पुलांसाठी टिपीएफ इंजिनिअरींग प्रायव्हेट लिमिटेड यांची तांत्रिक सल्लागार म्हणून व स्ट्क्टकॉन डिझाईन प्रायव्हेट लिमिटेड यांची फेरतपासणी सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये पात्र ठरणारी कंपनी गुजरातमधील आहे. गुजरात शासनाच्या रोड व बिल्डींग विभागात नोंदणीकृत कंत्राटदार असून महापालिकेत या कंपनीची नोंदणीही नाही. त्यामुळे गुजरातमधील कंपनी आता मुंबईतील पुलांच्या कामांमध्ये सहभाग घेत असल्याचे दिसून येत आहे.
यासंदर्भात पूल विभागाचे प्रमुख अभियंता बाबासाहेब साळवे यांच्यासाठी संपर्क साधला असता त्यांनी पुलाच्या बांधकामाबाबत कंत्राटदाराची निवड करण्यात आलेली आहे. स्थायी समितीच्या मान्यतेनंतर पुलाच्या कामाला सुरुवात होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -