घरमुंबईअभ्यास मंडळानी संदर्भ पुस्तकांची निर्मिती करावी

अभ्यास मंडळानी संदर्भ पुस्तकांची निर्मिती करावी

Subscribe

राज्यपालांच्या हस्ते प्राणीशास्त्र विषयाच्या १०० व्या पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अभ्यासमंडळाने तयार केलेल्या १०० व्या व विद्यापीठाने स्वतः प्रकाशित केलेल्या ‘टेक्सोनॉमी ऑफ कॉरडेट्स’ या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे करण्यात आले. डॉ. जी.बी.राजे, डॉ. दिलीप भारमल, डॉ.एम.एन. जांबळे, एस. एस. वाघमोडे आणि डॉ. एच. टी. बाबर यांनी तृतीय वर्ष बीएस्सी प्राणीशास्त्र विषयासाठी ‘टेक्सोनॉमी ऑफ कॉरडेट्स’ या पुस्तकाचे लेखन केले आहे.

प्राणीशास्त्र विषयातील शंभराव्या पुस्तकाचे प्रकाशन करताना आनंद होत असून आगामी काळात विद्यापीठाच्या इतरही अभ्यासमंडळानी संदर्भ पुस्तके तयार करावीत. आज ऑक्सफर्ड विद्यापीठ प्रेसप्रमाणे मुंबई विदयापीठानेही गुणवत्तापूर्ण आणि माफक दरात पुस्तके प्रसिध्द करावीत अशी अपेक्षा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केली. याप्रसंगी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरु प्रा. रविंद्र कुलकर्णी, राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, विशेष सचिव राकेश नाथानी, प्रा. विनायक दळवी, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. अजय भामरे, वित्त व लेखा अधिकारी माधवी इंगोले यांच्यासह प्राणीशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य, पुस्तकाचे लेखक आदी मान्यवर उपस्थित होते. जवळपास दीड वर्षापूर्वी प्राणीशास्त्र अभ्यासमंडळाने तयार केलेल्या ५० व्या पुस्तकाचे प्रकाशन झाले होते तर आता शंभराव्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. त्यामुळेच पुढील दोन वर्षात या अभ्यासमंडळाने पुस्तक तयार करण्याचे द्विशतक गाठावे अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

- Advertisement -

प्राणीशास्त्र अभ्यास मंडळाचे तत्कालिन अध्यक्ष प्रा. विनायक दळवी यांच्या संकल्पेतून साकारलेला हा प्रकल्प आहे. विशेष बाब म्हणजे हे शंभरावे पुस्तक प्रा. विनायक दळवी यांना समर्पित केले असून या पुस्तकाची प्रस्तावना उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय यांनी लिहली असून फोरवर्ड डॉ. संजय जगताप, सहसंचालक, उच्च शिक्षण पनवेल यांनी दिली आहे. अभ्यासक्रमावर आधारीत पुस्तक तयार करून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवडेल एवढ्या कमी किमतीत अशी पुस्तके विदयार्थ्यांना उपलब्ध करून देण्याची किमया प्रा. विनायक दळवी यांनी साधली असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. अकबर दळवी यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -