Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर मुंबई समीर वानखेडेंवर नबाव मलिकांनी त्यावेळी केलेल्या आरोपांबाबत जयंत पाटील म्हणाले...

समीर वानखेडेंवर नबाव मलिकांनी त्यावेळी केलेल्या आरोपांबाबत जयंत पाटील म्हणाले…

Subscribe

मुंबई : केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोचे (NCB) माजी विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. समीर वानखेडे यांनी ऑक्टोबर 2021 मध्ये मुंबईतील कॉर्डेलिया क्रूझ जहाजावर ड्रग्जच्या वादग्रस्त छाप्याचे नेतृत्व केले आणि अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला अटक केली होती. यावेळी राष्ट्रवादी नेते नबाव मलिक यांनी समीर वानखेडेंवर आरोप केले होते. यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, नबाव मलिक यांनी समीर वानखेडेंवर त्यावेळी केलेले आरोप खरे होते याचा तसा अर्थ दिसून येत आहे.

जयंत पाटील यांनी समीर वानखेडेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, नबाव मलिक यांनी समीर वानखेडेंवर जे आरोप केले होते ते सगळेच खरे ठरत आहे. सीबीआयने समीर वानखेडेंचा उल्लेख करून त्यांचा आरोपपत्रात उल्लेख केला असेल तर नबाव मलिक जे सांगत होते, त्यावेळी जी माहिती समोर येत होती ती खरी होती असा अर्थ दिसतो आहे. नबाव मलिक यांनाही अटक झाली आहे आणि ते तुरुंगात आहेत. त्यामुळे ते जेव्हा बाहेर येतील त्यावेळी मला खात्री आहे की, ते या समीर वानखेडेंबद्दल योग्य ती माहिती देतील, असा विश्वास जयंत पाटील यांना प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस नेहमची विरोधकांचे टार्गेट
जयंत पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी आमचा पक्ष आहे. शरद पवार यांनी महाविकास आघाडी महाराष्ट्रात निर्माण केल्यामुळे नेहमीच विरोधकांचे टार्गेट राष्ट्रवादी काँग्रेस ठरलेले आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने अधिक जोमाने तयारी करणे त्यादृष्टीने आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांच्यावर श्रद्धा ठेवून, निष्ठा ठेवून जे लाखो कार्यकर्ते काम करत आहेत, त्यांना एक विशिष्ट प्रकारची दिशा द्यायची आणि सक्षमपणाने हा पक्ष वाढवायचा ही भूमिका शरद पवार यांची आहे आणि त्या अनुषंगाने इथून पुढे बैठका होतील.

परमबीर सिंग यांचे निलंबन मागे घेतल्याबद्दल आमची काही तक्रार नाही
शिंदे-फडणवीस सरकारने परमबीर सिंग यांच्यावर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई मागे घेतली आहे. याबद्दल बोलताना जयंत पाटील म्हणाले की, सरकारच्या समोर जी माहिती आली असेल त्यावरून त्यांनी हा निर्णय घेतला असेल. परंतु ऍटेलिया परिसरात स्फोटके कोणी ठेवली आणि मनसुख हिरेन यांची हत्या नेमकी कोणी केली याचा खुलासा व्हावा, बाकी कुठल्या अधिकाऱ्यांचे निलंबन मागे घेतले तर आमची काही त्याबद्दल तक्रार नाही. पण नक्की कुणी मनसुख हिरेन यांची हत्या केली, कोणाचा त्या हत्येत हात आहे, स्फोटके कोणी ठेवली, कुणाच्या मार्गदर्शनाने ठेवली, कोणी तो कट रचला याची तपशीलवार माहिती महाराष्ट्रासमोर येणे आवश्यक आहे, असे जयंत पाटील यांना वाटते.

- Advertisement -

 

- Advertisment -