डोंबिवली बलात्कारात पुढार्‍यांचे नातेवाईकही आरोपी

4 years old minor girl allegedly raped by neighbor in sakinaka mumbai

डोंबिवलीतील सामूहिक अत्याचार प्रकरणात आरोपींमध्ये स्थानिक राजकीय पुढार्‍यांची मुले, काहींचे नातेवाईक आरोपी असल्याचे समोर येत आहे. या गुन्ह्यात पोक्सो कलमाअंतर्गत गुन्हे दाखल झाल्याने संबंधित राजकीय पुढार्‍यांची पायाखालची जमीन सरकू लागली आहे. एका पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेलिंगची धमकी देत परिसरातील मुलांनी विविध ठिकाणी घेऊन जात आळीपाळीने पीडितेवर बलात्कार केल्याचे उघड झाले. याबाबत मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्याने यात स्थानिक पातळीवर विविध राजकीय पक्षांच्या पुढार्‍यांची मुले तसेच नातेवाईक आरोपी असल्याची माहिती समोर येत आहे.

डोंबिवली पूर्वेतील सागाव येथील अल्पवयीन पीडितेचे लैंगिक शोषण तसेच मादक पदार्थ देणार्‍या आरोपींमध्ये भाजपा, शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातील पुढार्‍यांच्या कुटुंबातील मुले आणि नातेवाईक असल्याची माहिती आहे.

या गुन्ह्यातून आरोपींना वाचवण्याकरता मानपाडा पोलिसांवर मोठ्या प्रमाणात राजकीय दबाव येत आहे. मात्र, प्रकरण संवेदनशील असल्याने आणि नागरिकांमध्ये संताप असल्याने पोलिसांनी दबावाला न जुमानता गुन्हा दाखल केला. भाजपच्या येथील एका माजी नगरसेविकेने पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.

आरोपी हे भोपर, सागाव, नांदिवली, देसलेपाडा येथे राहत असल्याची माहिती मिळत असून साधारण २० ते २८ वयोगटातील हे आरोपी आहेत. यातील दोन आरोपी मात्र अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. राजकीय पुढार्‍यांच्या नातेवाईकांची आणि मुलांची नावे पोलिसांकडे येऊ लागल्याने ते वगळण्यासाठी शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकल पुढार्‍यांनी पोलीस स्टेशनमध्ये येऊन दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी दबावाला थारा न देता अखेर या गुन्ह्यात पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात एकूण २९ जणांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या असून ४ आरोपी अद्यापही फरार असल्याचे समजते.

आरोपींची संख्या ३३ वर २९ जणांना अटक

डोंबिवलीतील सामूहिक बलात्कार प्रकरणी आरोपींची संख्या वाढतच असून ती आता ३३ वर पोहोचली आहे. आतापर्यंत २९ जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटक झालेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी दिली. तसेच उर्वरित ४ फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी तातडीने ४ पोलीस पथके स्थापन करून ४ तासात २३ जणांना तर उर्वरित ६ जणांना १२ तासात अटक केली आहे. उर्वरित ४ आरोपी फरार आरोपींचा पोलीस कसून शोध घेत आहेत. यापैकी काही आरोपी नवी मुंबईत असल्याची माहिती निवृत्त पोलीस अधिकारी दत्ता घुले यांना मिळाली होती. त्यांनी त्वरित मानपाडा पोलिसांशी संपर्क साधून याची माहिती दिली. त्यामुळे नवी मुंबईतून दोन आरोपी पोलिसांच्या हाती लागले. या गुन्ह्यातील आरोपींना त्वरित अटक केली गेल्याने मानपाडा पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

आरोपींचे वकीलपत्र न घेण्याचे आवाहन
डोंबिवलीतील अत्याचार प्रकरणातील आरोपींचे वकीलपत्र कोणत्याही वकिलाने घेऊ नये, असे आवाहन कल्याण जिल्हा फौजदारी न्यायालय वकील संघटनेने केले आहे. बलात्कार करणार्‍या आरोपीचे वकीलपत्र काही वकील घेतात आणि आरोपी सुटतो, यामुळे बलात्कार करणार्‍यांचे मनोबल वाढते. बलात्कार गुन्ह्यांची संख्या कमी होण्याऐवजी ती वाढत जात असून वकीलसुद्धा समाजातील एक घटक असल्याने समाजासाठी काहीतरी देणे लागत असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

मुख्य आरोपीने लावला होता ५०० रुपयांचा रेट

पीडितेच्या तक्रारीत दिली पोलिसांना माहिती 

डोंबिवली सामूहिक अत्याचार प्रकरणात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा पीडितेचा वापर पैसे कमवण्यासाठी करीत असल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी हा दोन जणांकडून प्रत्येकी ५०० रुपये घेत असताना बघितल्याचा धक्कादायक आरोप पीडितेने पोलीस जबाबात केला आहे. याबाबत पोलिसांकडे चौकशी केली असता पीडितेने केलेल्या प्रत्येक आरोपाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

डोंबिवली पूर्वेत गुरुवारी उघडकीस आलेल्या १५ वर्षीय मुलीवरील सामूहिक अत्याचार प्रकरणात नवीन नवीन खुलासे होत आहे. या प्रकरणात एकूण ३३आरोपी असून मानपाडा पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने शुक्रवार दुपारपर्यंत २८ आरोपींना अटक केली असून त्यात दोन आरोपी अल्पवयीन आहेत.

पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. २३ मार्च रोजी या पीडितेला मुख्य आरोपी असलेल्या २१ वर्षीय मित्राने डोंबिवली पूर्व येथील नवनीत नगर येथे राहणार्‍या एका तरुणाच्या घरी घेऊन गेला होता. त्या खोलीत अगोदरच १४ ते १५ जण उपस्थित होते. मुख्य आरोपीने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन कोल्ड्रिंग पिण्यासाठी दिले, त्यानंतर तिला भोवळ आली आणि ती निपचित पडली. ती जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा ती बेडरूम मध्ये होती. बेडरूममधून हॉलमध्ये येत असताना हॉलमध्ये मुख्य आरोपी हा दोघांजवळून प्रत्येकी ५०० रुपये घेताना दिसला, असे पीडितेने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

पीडितेच्या जबाबात ही धक्कादायक बाब समोर आली असता मुख्य आरोपी हा पीडितेला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिचा वापर पैसे कमवण्यासाठी करीत असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत असून या अनुषंगाने पोलिसांकडून तपास केला जात आहे. याबाबत मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाहरी चौरे यांच्याकडे याबाबत चौकशी केली. पीडितेने जबाबात केलेल्या प्रत्येक आरोपाची चौकशी करण्यात येत असून असे काही आढळून आल्यास गुन्ह्याच्या कलमात वाढ करण्यात येईल, अशी माहिती दिली.