मुंबई : रेल्वे प्रशासनाकडून मुंबईतील (Mumbai) रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी दर दरिवारी मेगा ब्लॉक घेण्यात असतो. परंतु आता तीन दिवसांनी गणेशोत्सवाला सुरूवात होणार आहे. मुंबई आणि एमएमआरडीएच्या अंतर्गत येणारे नागरिक मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवेवर प्रवासासाठी अवलंबून असतात. गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) काळात अनेक भाविक मुंबई आणि परिसरातील गणेश मंडळांना भेटी देत असतात. त्यामुळे त्यांना त्रास होऊ नये यासाठी गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतील रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार नाही, असा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. (Relief for Mumbaikars during Ganeshotsav There will be no mega block on all the three railway lines)
गणेशोत्सवाच्या काळात भाविकांना मुंबई आणि परिसरातील गणेश मंडळांना भेटी देत असताना त्यांना रेल्वेने प्रवास करताना मेगाब्लॉकमुळे कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी गणेश विसर्जनापर्यंत मेगाब्लॉक रद्द करण्यासंदर्भात मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर नरेश ललवानी यांनी निर्णय घेतला आहे. गणेश भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी मागणी करण्यात आली होती, त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी यासंदर्भात ट्वीट करत माहिती दिली आहे.
मुंबईतील गणेश भक्तांसाठी खुशखबर!
गणेशोत्सवाच्या दरम्यान मुंबईत रेल्वेने प्रवास करणाऱ्या भाविकांना रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे प्रवासात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून तो गणेश विसर्जनापर्यंत रद्द करण्याच्या संदर्भात मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर श्री नरेश ललवानी जी यांच्याशी बोलणे…
— Mangal Prabhat Lodha (@MPLodha) September 16, 2023
यंदाचा गणेशोत्सव 19 सप्टेंबरपासून सुरु होणार असून अनंत चतुर्दशी 28 सप्टेंबरला आहे. यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साहाचं वातावरण आहे. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल, पालघर, वसई आणि विरार या भागातून अनेक भाविक मुंबईतील गणेश मंडळांना भेट देण्यासाठी रेल्वेने प्रवास करण्यासाठी येत असतात. अशा भाविकांना गणेशोत्सव काळात मेगाब्लॉकमुळे कोणताही त्रास होऊ नये, यासाठी रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतला आहे.
गणेशोत्सव काळात 24 तास लोकल रेल्वे सुरू ठेवावी
दरम्यान, गणेशोत्सव काळात मेगाब्लॉक रद्द करण्यात आला असली तरी आता या काळात 24 लोकल रेल्वे सुरू ठेवावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. त्यांनी आज (16 सप्टेंबर) पत्रकार परिषदेत म्हटले की, मुंबई आणि परिसरातील गणेश मंडळांना भेटी देण्यासाठी येणारे भाविक तासांनतास रांगेत उभे असतात. परिणामी त्यांना घरी परतण्यासाठी वाहनांची उपलब्धता नसल्याने त्यांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे 19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबरपर्यंत लोकल रेल्वे 24 तास सुरू ठेवावी अशी मागणी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे.