आघाडीचे मंत्री जनतेच्या कामासाठी कार्यतत्पर; जलसंपदा मंत्री जयंत पाटलांनी दुष्काळी जिल्ह्यासाठी घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

Resources Minister Jayant Patil took an important decision for the drought-hit district

एकीकडे आघाडी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात असतानाच जनतेच्या कामासाठी आघाडी सरकारचे मंत्री कार्यतत्पर असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज मंत्रालयात बीड आणि सोलापूर जिल्हयातील बार्शी या दुष्काळी भागाला पाण्याची कमतरता भासू नये यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

बीड जिल्ह्यातील कायम दुष्काळग्रस्त असलेल्या भागास वरदान ठरणाऱ्या कृष्णा मराठवाडा योजनेंतर्गत उपसा सिंचन योजना क्र.३ (शिंपोरा ते खुंटेफळ साठवण तलाव) योजनेच्या निविदा काढण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेसाठी अंदाजे १५२७ कोटी रुपयांचा खर्च येणार असून या योजनेमुळे आष्टी व कडा तालुक्यातील ८१४७ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. येत्या दोन वर्षात ही योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

खुंटेफळ तलावात ७२.३३ किमीच्या बंद पाईपलाईनद्वारे १.६८ टीएमसी पाणी देण्यात येणार आहे. आमदार बाळासाहेब आजबे गेले काही वर्षांपासून या प्रकल्पाचा पाठपुरावा करत होते. ही योजना महाविकास आघाडी सरकारच्या जलसंपदा विभागाची उत्कृष्ट अभियांत्रिकी नमुना म्हणून सिद्ध होईल असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

पाण्याचा दुर्भिक्ष असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्याच्या उपसा सिंचन योजनेच्या ७६६.०९ कोटी रुपये किंमतीची द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या योजनेमुळे सिना नदीवरील अस्तित्वात असलेल्या को.प बंधाऱ्यातून २.५९ टीएमसी पाणी दोन टप्प्यात उचलण्यात येणार आहे. या योजनेतून सोलापूर जिल्ह्यातील आवर्षण प्रवण माढा व बार्शी तालुक्यातील १५००० हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ देणे प्रस्तावित आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.