घरताज्या घडामोडीगोकूळधाम प्रसुतीगृहाच्या जागेवर रेस्ट हाऊस, प्रिती सातम यांनी केला पर्दाफाश

गोकूळधाम प्रसुतीगृहाच्या जागेवर रेस्ट हाऊस, प्रिती सातम यांनी केला पर्दाफाश

Subscribe

दोन वर्षांत संस्थेने कोणतेही काम न करता आता कर्मचाऱ्यांच्या राहण्याची केली व्यवस्था

दोन वर्षांपूर्वी मुंबइ महापालिकेने गोरेगाव गोकुळधाम येथील प्रसुतीगृहाची इमारत लाईफलाईन  केअर हॉस्पिटलला एनआयसीयूसह प्रसुतीगृह सुरु करण्यासाठी देण्यात आली. परंतु दोन वर्षांमध्ये प्रसुतीगृह सुरु न करणाऱ्या संस्थेने कोरेानाच्या काळात आपल्या रुग्णलयांमधील डॉक्टर, परिचारिका तसेच निम वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या राहण्याची सुविधा याठिकाणी केल्याची बाब समोर  आली आहे. भाजपच्या स्थानिक नगरसेविका प्रिती मनोज सातम यांनी हा प्रकार उघकीस आणून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या संस्थेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. एकाबाजुला कोरोना आरोग्य केंद्र मोकळ्या निर्माण केले जात आहेत, आणि दुसरीकडे आपल्याच वास्तूंचा इतर संस्था गैरवापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

गोरेगाव गोकूळधाम येथील प्रसुतीगृहाच आरक्षण असल्याचे विकासकाने प्रसुतीगृहाची इमारत २०१३मध्ये महापालिकेला बांधून दिली. परंतु तेव्हापासून ही वास्तू पडिक होती आणि आसपासच्या लोकांकडून त्याचा गैरवापर केला जात होता. त्यामुळे याठिकाणी प्रसुतीगृहाची मागणी होवू लागल्याने २०१८मध्ये महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने खासगी सहभाग तत्वावर याठिकाणी प्रसुतीगृह सुरु करून याठिकाणी एनआयसीयू सुरु करण्याच्या अटीवर ही वास्तू लाईफ लाईन हॉस्पिटलच्या संस्थेला दिली. त्यानंतर याबाबतचा करार पत्र होवून ही जागा संस्थेच्या ताब्यात गेल्यानंतरही मागील दोन वर्षांमध्ये या संस्थेने कोणत्याही प्रकारची सुविधा याठिकाणी उपलब्ध करून दिली नाही. उलट आता या जागेचा वापर राहण्याकरताच होत असल्याची बाब समोर आली आहे.

- Advertisement -

भाजपच्या नगरसेविका प्रिती सातम यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. याबाबत बोलतांना त्यांनी, प्रसुतीगृहाच्या या इमारतीत ग्रीलवर कपडे वाळत घातल्याचे आपल्या निदर्शनास आले. त्यामुळे याठिकाणी क्वारंटाईन सेंटर निर्माण केले का याबाबत आपण चौकशी केली. परंतु याठिकाणी डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी राहत असल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे हे डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी महापालिकेच्या रुग्णालयातील असावेत असा समज झाला म्हणून विचारपुस केली असता, हे सर्व डॉक्टर मालाड व कांदिवलीमधील लाईफलाईन केअर रुग्णालयातील असल्याची बाब समोर आली. विशेष म्हणजे याच लाईफलाईन केअरला ही जागा दिली असून त्यांनी दोन वर्षांत प्रसुतीगृह सुरु केले नाही, परंतु आता त्याचा वापर स्वत:ची मालकी असल्यासारखी केली जात आहे.

डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांबाबत आम्हाला पूर्णपणे सहानभूती आहे. परंतु ज्या संस्थेने नियमांचे उल्लंघन करत यांची याठिकाणी राहण्याची व्यवस्था केली आहे, हे चुकीचे आहे. या संस्थेने प्रसुतीगृहाची उभारणी केली नाही. मग याठिकाणी आपल्याच रुग्णालयातील डॉक्टरांची व कर्मचाऱ्यांची राहण्यासाठी सुविधा करण्यापूर्वी त्यांनी महापालिकेच्या कोणत्या अधिकाऱ्यांची परवानगी घेतली हे समोर यायला हवे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरेानाबाधित रुग्णांसाठी डायलेसिस सुविधा किंवा कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी सुविधा केंद्र उभारणे आवश्यक आहे. परंतु महापालिका प्रशासन जागेसाठी इतरांना पैसे मोजते आणि खासगी संस्था आपल्याच जागेचा गैरवापर करत आहे, याकडे आपण प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी याप्रकरणी लक्ष घालून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थेवर त्वरीत कारवाई करून ही वास्तू पुन्हा आपल्या ताब्यात घेत त्याठिकाणी महापालिकेच्यावतीने सुविधा उपलब्ध करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – तज्ज्ञ म्हणतात, १५ ऑगस्टपर्यंत कोरोनावर लस येणं निव्वळ अशक्यच!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -