महापालिका शाळेत ताशी १५० रुपयांवर शिक्षकांची तात्पुरती नेमणूक

महापालिका शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२२ - २३ मध्ये पटसंख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी तासाला १५० रुपये मानधन या तत्वावर दररोज ६ तासांसाठी शिक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे.

Mumbai Municipal Corporation

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकांची कमतरता भासत आहे. शिक्षकांची नवीन भरती करण्यासाठी खूप वेळ लागणार आहे. त्यामुळे पालिकेने त्यावर रामबाण उपाययोजना म्हणून दर तासाला १५० रुपये मानधन या तत्वावर दररोज ६ तासांसाठी शिक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

महापालिका शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२२ – २३ मध्ये पटसंख्येत मोठी वाढ झाली आहे. विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात शिक्षकांची भरती करण्याची आवश्यकता आहे. शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्यासाठी शासनाच्या पवित्र पोर्टलद्वारे / जाहिरातीद्वारे भरती प्रक्रिया पूर्ण होण्यास अधिक कालावधी लागू शकतो. त्यामुळे शाळेतील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी संबंधित प्राथमिक / माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांद्वारा आवश्यक असणाऱ्या शिक्षकांच्या रिक्त पदावर तात्पुरत्या स्वरूपात तासिका तत्वावर सेवा उपलब्ध करून घेण्याकरिता पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी मंजुरी दिली आहे.

त्यानुसार सेवानिवृत्त शिक्षक / मुख्याध्यापक अथवा नियमानुसार आवश्यक अर्हताप्राप्त असणाऱ्या उमेदवारांची प्रति तास १५० रुपये ( दररोज कमाल ६ तास ) मानधनावर पर्यायी शिक्षक नेमण्याचे अधिकार संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत. शाळेच्या आवश्यकतेपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास D.Ed / DT.Ed व B.Ed या व्यावसायिक अर्हतेच्या गुणांच्या आधाराने प्राधान्यक्रम ठरवून निवड करण्यात येणार आहे. रिक्त व दीर्घ मुदत रजेवर असणाऱ्या शिक्षकांच्या जागेवर इयत्ता पहिली ते दहावीच्या वर्गासाठी ११ ते १२० दिवसांसाठी ही पर्यायी शिक्षकांची सेवा घेण्यात येणार आहे . संबंधित विभागाचे उपशिक्षणाधिकारी, अधिक्षक ( शाळा ) , प्रशासकीय अधिकारी ( शाळा ) , निरीक्षक ( शाळा ) यांच्यामार्फत रिक्त पदांची खात्री केल्यानंतर पर्यायी शिक्षकांच्या सेवा घेता येतील . इच्छुक उमेदवारांनी नजीकच्या महापालिका शाळेमध्ये अर्ज करून मुख्याध्यापकांशी प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.