घरमुंबईसुशांत सिंह मृत्यूचा तपास : इडीकडून रियाला क्लीन चिटची शक्यता

सुशांत सिंह मृत्यूचा तपास : इडीकडून रियाला क्लीन चिटची शक्यता

Subscribe

‘हत्ये’चे पुरावे अजूनही नाहीत!

सुशांत सिंह राजपूत याची ‘हत्या’ झाल्याचे कोणत्याही प्रकारचे ठोस-सबळ पुरावे दीड महिन्याच्या तपासानंतरही सीबीआयच्या हाती आलेले नाहीत. तपास ‘भरकटला’असून ‘रखडला’असल्याचे सुशांत सिंहच्या कुटुंबियांकडून पुन्हा सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. तसेच सुशांत सिंह याच्या खात्यातील सुमारे पंधरा कोटी रुपये रिया आणि कुटुंबियांनी हडपल्याच्या तक्रारीतही तथ्य नसल्याचे इडीच्या तपासातून निष्पन्न झाल्याने या प्रकरणी आर्थिक गैरव्यवहारांबाबत ‘इडी’कडून रियाला लवकरच क्लीन चिट मिळण्याच्या दाट शक्यता आहेत. तर ‘ड्रग्ज’ची देवाण-घेवाण आणि सेवन याबाबत एन.सी.बी.च्या रडारवर असलेल्या बॉलिवूडच्या सिनेतारकांच्या चौकशीतून सुशांत मृत्यू प्रकरणांवर कोणताही नवा प्रकाश पडला नसल्याचे खुद्द एन.सी.बी.चे अधिकारीच सांगत आहेत.
नजीकच्या काळात सुशांत सिंहचा मृत्यू आत्महत्याच असल्याचे निष्पन्न होईल असा विश्वास मुंबईतील ज्येष्ठ पोलीस अधिकारी सांगतात. तर सुशांत सिंह मृत्यूचे राजकारण करून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षड्यंत्र असल्याचेच आता स्पष्ट होत असल्याचे महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेते सांगतात.

सुुशांत सिंहच्या आत्महत्येला रिया चक्रवर्ती जबाबदार असल्याचे पुरावे मोडून तोडून जोडण्याचा प्रयत्न होत असल्याने सीबीआयवर तसा दवाब असल्याची चर्चा पोलीस आणि राजकीय वर्तुळात सुरू आहेत. दरम्यान, सुशांत सिंह मृत्यूवेळी त्याच्या घरात असलेल्या त्याचा मित्र-साथीदार सिद्धार्थ पटणी याच्याविषयी सुरुवातीस कुटुंबियांनी कोणतीही तक्रार केली नव्हती. प्रत्यक्ष साक्षीदार असलेला पटणी आता पलटला असून तो रियाला मदत करत असल्याचा नवा आरोप सुशांत सिंहच्या कुटुंबियांकडून आता केला जात आहे.

- Advertisement -

 

आर्थिक गैरव्यवहाराचे पुरावे नाहीत!

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्ती आणि तिचे नातेवाईक-निकटवर्तीय यांच्या सखोल चौकशीदरम्यान कोणत्याही प्रकारचे ‘मोठे गैरव्यवहार’ झाले नसल्याचे ‘इडी’च्या तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे सुशांत सिंह याच्या खात्यावरील सुमारे पंधरा कोटी रुपये रिया आणि कंपूने हडपल्याच्या राजपूत कुटुंबियांच्या तक्रारीत ‘तथ्य’ नसल्याने नजीकच्या काळात इडीकडून रियाला ‘क्लीन चिट’ मिळणार असल्याचे सांगण्यात येते. इडी डायरेक्टर संजय कुमार मिश्रा आणि स्पेशल डायरेक्टर सीमांचल दाश याबाबत आपला अहवाल लवकरच न्यायालयात सादर करतील, असे सांगितले जाते.
रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबियांचे गेल्या दोन वर्षातील ‘आर्थिक व्यवहार’ इडीकडून तपासण्यात आले. रियाची देशभरातील एकूण मालमत्ता, विविध बँकेतील खात्यांमधील रक्कम, लॉकर, स्थावर जंगम मालमत्ता तसेच इतर बेनामी व्यवहार इडीच्या रडारवर होते. मात्र, यातून कोणत्याही प्रकारचे ठोस-सबळ पुरावे ‘इडी’च्या हाती आले नाहीत, असे सांगण्यात येते.
सुशांत सिंह राजपूत याचे काही डेबिट, क्रेडीट कार्ड रिया वापरत होती. या खात्यांवरून गेल्या वर्षभरात काही ठराविक रक्कम नियमितपणे ‘कॅश’ केली जात होती. सदरची संशयास्पद रक्कम सुशांत सिंहच्या अंमली पदार्थ सेवनाच्या व्यसनासाठी वापरली जात असल्याचे कबुली जबाब रिया आणि कुटुंबियांकडून देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर ‘इडी’ने नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोला (एनसीबी) पत्राद्वारे एक गुप्त अहवाल पाठवला होता. सोबत सुशांत, रिया, शौविक, सुशांतचे मॅनेजर, रियाचे मॅनेजर यांचे कॉल रेकॉर्ड आणि व्हॉट्स अ‍ॅप चॅट यांचा तपशील जोडण्यात आला होता. यानंतर ‘इडी’च्या उच्च पदस्य अधिकार्‍यांशी आणि सी.बी.आय. आणि अधिकार्‍यांबरोबर सल्लामसलत करून एनसीबीने स्वतंत्र गुन्हा दाखल केला आणि बॉलिवूडचे कनेक्शन उघड झाल्यावर त्या दिशेने तपास केंद्रित केला होता.

- Advertisement -

सिनेतारकांचा मृत्यूशी संबंध नाही!

सुशांत सिंहच्या मृत्यू प्रकरणात दीपिका, सारा, श्रद्धा, रकुलप्रीत सिंह या सिनेतारकांचा तसेच त्यांचे व्यवस्थापन करणार्‍या करिष्मा प्रकाश, जया शाह यांच्या चौकशीतून कोणत्याही प्रकारचे संशयास्पद पुरावे नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)च्या हाती लागले नसल्याचे सांगितले जाते. या सर्वांची प्राथमि चौकशी करून त्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. पुढील तपासादरम्यान या संदर्भातील अहवाल न्यायालयासमोर ठेवण्यात येईल, असे एनसीबीच्या उच्च पदस्य अधिकार्‍यांनी सांगितले.

रिया चक्रवर्ती, तिची मॅनेजर श्रुती मोदी आणि सुशांत सिंहची टॅलेंट मॅनेजर जया शाह यांच्या चौकशीतून मोबाइल कॉल रेकॉर्ड, व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधून सदर सिनेतारकांचे ड्रग्जच्या देवाण-घेवाण आणि सेवन याबद्दल संशयास्पद संभाषण उघडकीस आले होते. या पार्श्वभूमीवर दीपिका, सारा, श्रद्धा, रकूलप्रीत सिंह यांचे एनसीबीने जबाब नोंदवून घेतले आहेत. तसेच अधिक चौकशीसाठी त्यांचे मोबाइल जप्त करून ‘डिलीट डाटा’ परत मिळवण्यासाठी तज्ज्ञांकडे पाठवण्यात आले आहेत.

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात संशयास्पद असा कोणताही ठोस पुरावा एनसीबी समोर आलेला नाही. सदर सिनेतारकांनी ड्रग्ज कुठे उपलब्ध होईल याची चौकशी केली होती का? ते कोणाकडून मागवले? कोणाकोणाला दिले? तसेच स्वत: त्याचे सेवन केले का? या संदर्भातील त्यांचे जबाब नोंद करण्यात आले आहेत. तसेच सुशांत सिंहबरोबर कशा आणि कोणत्या स्वरुपाचे संबंध होते. त्यांच्या फार्म हाऊस, निवासस्थानावर तसेच परदेशात किती वेळा सदर सिनेतारा गेल्या होत्या याबाबतचा तपशील एनसीबीने नोंद करून घेतला आहे. तसेच सुशांत-रियाच्या कोणत्या पार्टीत किती वेळा गेले होते. तेथे कोण होते! पार्टीत ‘ड्रग्ज’चे सेवन झाले का? आदी बाबी एनसीबीने जाणून घेतल्या असून या संदर्भात सविस्तर अहवाल न्यायालयात मांडण्यात येईल, असे एनसीबीच्या उच्च पदस्य अधिकार्‍यांनी सांगितले.

सी.बी.आय.चा तपास रखडला !

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाचा सखोल तपास करणार्‍या सी.बी.आय.ला महिन्याभराचा कालावधी उलटून गेल्यानंतरही सुशांत सिंहची ‘हत्या’ झाल्याचे कोणतेही ठोस, सबळ संशयास्पद पुरावे अद्यापही मिळालेले नाहीत. गेल्या आठवड्याभरापासून हा तपास पुराव्यांअभावी रखडला असल्याने सी.बी.आय अधिकारी दिल्लीतच सल्लामसलत करत असल्याचे सांगण्यात येते.

सी.बी.आय.च्या तपासावरही सुशांत सिंह कुटुंबियांनी आणि त्यांच्या वकिलांनी नाराजी व्यक्त करत तपास लांबत चालल्याने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची मानसिक तयारी केली असल्याचे समजते. राजपतूत कुटुंबियांची मूळ तक्रार आणि सध्याचा ड्रग्ज भोवती केंद्रित झालेला तपास यामुळे न्यायाच्या प्रतिक्षेत असलेले कुटुंबिय संभ्रमात असल्याचे त्यांच्या वकिलांकडून अलीकडे वारंवार सांगण्यात येत आहे.

सुशांत सिंहच्या मृत्यूचा वैद्यकीय अहवाल ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडीकल सायन्स (एम्स)कडून पडताळून पाहण्यात येत आहे. तसेच नव्याने तपासणी करून मृत्यूचे ‘कारण’ शोधण्यता येत आहे. एम्सचे अधिकारी आणि सी.बी.आय. पथक यांच्यातही गेल्या आठवड्याभरात निर्णायक बैठक झाली नसल्याचे कळते.
अशातच एम्सच्या वैद्यकीय पथकाने सुशांत सिंह याच्या मृतदेहाचे फोटो पाहून त्यावरील कथित जखमा हेरुन घाईगडबडीत कोणताही निर्णय देऊ नये अशी अपेक्षा रियाचे वकील सतीश माने शिंदे यांनी व्यक्त केली आहे. तसेच सी.बी.आय.ने नवीन स्वतंत्र मेडीकल बोर्ड स्थापन करून वैद्यकीय अहवालातील त्रुटी दूर कराव्या, असे म्हटले आहे.

प्रसाद नेरूरकर

लेखक हे गुन्हेगारी वार्तांकन करणारे जेष्ठ पत्रकार आहेत


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -