Eco friendly bappa Competition
घर मुंबई शिवडीतील रस्त्यांचे काम रखडले; कंत्राटदारावर कारवाईची मागणी

शिवडीतील रस्त्यांचे काम रखडले; कंत्राटदारावर कारवाईची मागणी

Subscribe

शिवडी येथील सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ झाल्यानंतरही रस्त्याचे काम रखडविणाऱ्या कंत्राटदारावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

मुंबई : शिवडी येथील सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ झाल्यानंतरही रस्त्याचे काम रखडविणाऱ्या कंत्राटदारावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. मुंबईत पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडून वाहतुकीला अडथळे निर्माण होतात. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होते. हजारो मनुष्यतास त्यात वाया जातात. तर कधी कधी खड्ड्यांमुळे वाहन अपघात होऊन त्यात वाहन चालक कमी – अधिक प्रमाणात जखमी होतात. अगदी ते खड्डे वाहन चालकांच्या जीवावर बेततात. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी पावसाळ्यापूर्वीच रस्त्यांच्या दुरुस्तीची, नवीन रस्ते बनविण्याची कामे मार्गी लावण्यासाठी धडपडत असतात.

रस्त्यांच्या कामांसाठी पालिकेकडे सतत पाठपुरावाही करण्यात येतो. मात्र कधी कधी काही त्रुटी राहिल्यास, निधीची अडचण आल्यास रस्त्यांची कामे रखडतात. मात्र शिवडी येथील प्रभाग क्रमांक २०६ मध्ये, ठोकरसी जीवराज या डांबरी रस्त्यावर दरवर्षी वाहतुकीचा भार वाढल्याने व काही कामांसाठी चर खोदल्यास आणि ते नीटपणे न बुजविल्यास खड्डे पडून त्याचा रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेवर विपरीत परिणाम होतो. तसेच, त्याचा पादचाऱ्यांना, वाहन धारकांनाही मोठा त्रास होतो, अशी माहिती आता समोर आली आहे.

- Advertisement -

त्यामुळे शिवडी येथील स्थानिक माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी, त्यांच्या विभागातील ठोकरसी जीवराज या रस्त्यावर वारंवार खड्डे पडू नयेत यासाठी सदर रस्ता सिमेंट काँक्रीटचा बनविण्याची मागणी केली होती. त्यास काही कालावधी गेला. अखेर पालिका प्रशासनानेही सकारात्मक प्रतिसाद देत टेंडर काढून पात्र ठरलेल्या मेसर्स रोड वे सोल्युशन इंडिया इन्फ्रा या कंपनीला कंत्राटदार म्हणून नेमले. त्यानुसार, स्थानिक आमदार अजय चौधरी यांच्या हस्ते नारळ वाढवून रस्त्याच्या कामाचा शुभारंभही करण्यात आला. मात्र आज कंत्राटकाम देऊन एप्रिल महिना संपायला आला. दीड महिन्याने पावसाळा सुरू होईल.

हेही वाचा – सुदानमधील भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी ‘ऑपरेशन कावेरी’ सुरू

- Advertisement -

दरम्यान, मुंबईत अवकाळी पाऊस पडत असतो. मात्र कंत्राटदाराकडून अक्षम्य हलगर्जीपणा होत असून अद्यापही कामाला अपेक्षित सुरुवात झालेली नाही. परिणामी यंदाच्या पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण होण्याची शक्यता वाटत नाही. पावसाळा संपल्यानंतरच रस्ते कामाला सुरुवात करावी लागेल व काही कालावधीनंतरच रस्त्याचे काम पूर्ण होईल. एका महत्त्वाच्या व रहदारीच्या रस्त्याचे काम रखडल्याने व त्यास कंत्राटदाराचा हलगर्जीपणाच कारणीभूत आहे. या रस्त्याचे काम रखडल्याने यंदाच्या पावसाळ्यात सदर रस्त्यावर खड्डेच खड्डे पडणार असून त्याचा वाहन चालकांना, सामान्य नागरिकांना मोठा त्रास होणार आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने सदर रस्त्याचे काम रखडविणाऱ्या कंत्राटदाराची चौकशी करून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

- Advertisment -