घरमुंबईरस्ते कामांच्या निविदा बनवण्यावरच सुमारे २० कोटींवर खर्च

रस्ते कामांच्या निविदा बनवण्यावरच सुमारे २० कोटींवर खर्च

Subscribe

मुंबईतील रस्ते कामांच्या निविदा बनवण्यासाठी महापालिकेच्यावतीने नेमण्यात आलेल्या सल्लागारांपैकी चार परिमंडळातच मागील पाच वर्षांत तब्बल १५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. यापैकी आतापर्यंत १२ कोटी रुपयांची रक्कम सल्लागारांना अदा करण्यात आली असून उर्वरित ३ कोटींची रक्कम सल्लागारांना देणे शिल्लक असल्याची माहिती हाती आली आहे. केवळ चार परिमंडळांमधील ही आकडेवारी असून उर्वरित तीन परिमंडळांमधील सल्लागार शुल्काचा अंदाज घेतल्यास ही आकडेवारी सुमारे २० कोटींपेक्षा अधिक असल्याचे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

महापालिकेने शहर, पश्चिम आणि पूर्व उपनगरातील विविध रस्त्यांच्या सुधारणा,दुरुस्ती व बांधकाम हे डांबरी तसेच सिमेंटीकरण करण्यासाठी निविदा मागवली होती. या निविदा मागवण्यासाठी रस्ते विभागाने संकल्पचित्रे व अंदाजपत्रके बनवण्यासाठी विभाग निहाय तांत्रिक सल्लागाराची नेमणूक केली होती. त्यानुसार संकल्पचित्रे व अंदाजपत्रके बनवण्यासाठी तीन वर्षांच्या कालावधीसाठी सात सल्लागार संस्थांचे मंडळ स्थायी समितीच्या मंजुरीने स्थापन केले होते. यामध्ये कन्स्ट्रुमा कन्सल्टंसी, टेक्नोजिएम कन्सल्टंट, मोनार्च सर्वेयर्स अँड इंजिनिअरींग याची पश्चिम उपनगराकरता, जी.एम.डी कन्सल्टंट आणि प्रोजेक्ट कन्सल्टींग यांची शहर भागासाठी आणि स्पेक्ट्रम टेक्नो कन्सल्टंट व श्रीखंडे कन्सल्टंट यांची पूर्व उपनगरातील कामांसाठी सल्लागार म्हणून निवड करण्यात आली होती.

- Advertisement -

मात्र, पश्चिम उपनगरातील तीन परिमंडळ व पूर्व उपनगरातील एक मंडळ अशाप्रकारे चार परिमंडळांमध्ये सल्लागारांनी १५.३२ कोटींची बिले सादर केली आहेत. त्यातील १२.४९ कोटी रुपयांची बिले सल्लागारांना देण्यात आली आहेत. त्यामुळे सुमारे ३ कोटी रुपयांच्या अतिरिक्त बिलांसाठी सल्लागारांकडून प्रयत्न सुरू असल्याचे विभागाचे सांगण्यात येते. यामध्ये पश्चिम उपनगरामध्ये २.६५ कोटी रुपये तर पूर्व उपनगरात १.१७ कोटी रुपयांचा अशाप्रकारे ३.८२ कोटींचा अतिरिक्त खर्च झाला असल्याने प्रशासनाने या अतिरिक्त बिलाची रक्कम देण्यासाठी स्थायी समितीपुढे प्रस्ताव सादर केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -