भाऊबीजेच्या दिवशीच कल्याणमध्ये ज्वेलर्स दुकानावर दरोडा, एकाला अटक

कल्याण पूर्वेला असलेल्या नांदिवली येथील वैष्णवी ज्वेलर्स दुकानावर भरदिवसा तीन शस्त्रधारी तरुणांनी दरोडा घातल्याची खळबळजनक घटना भाऊबीजेच्या दिवशी घडली. या दरोड्यात दुकानाचे मालक गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान, स्थानिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एका दरोडेखाराला पकडण्यात यश आले असून त्याचे दोन साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले. या दरोड्यात सुमारे १० लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची लूट झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आहे.

कल्याण पूर्वेतील नांदिवली या ठिकाणी रुपाराम खेताराम चौधरी यांचे वैष्णवी ज्वेलर्स नावाचे सोन्याच्या दागिन्यांचे दुकान आहे. सोमवारी भाऊबीजेच्या दिवशी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास परिसरात वर्दळ कमी असल्याचा फायदा घेत तीन शस्त्रधारी तरुणांनी दुकानात प्रवेश केला. त्यावेळी दुकानात दुकानाचे मालक रुपाराम चौधरी हे स्वतः होते. तिघांपैकी एकाने त्यांना अंगठी दाखवण्यास सांगितली. रुपाराम हे अंगठी काढण्यासाठी मागे वळताच तिघांपैकी एकाने त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. हल्ला होऊनही रुपाराम यांनी दरोडेखोरांना विरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना रिव्हॉल्वरचा धाक दाखवण्यात आला.

काही वेळाने दरोडेखोरांनी दुकानातील दागिने लुटून पोबारा करीत असताना जखमी रुपाराम यांनी धाडस दाखवत एका दरोडेखोराला पकडून ठेवले. दुकानात आरडाओरड ऐकून स्थानिकांनी दुकानाच्या दिशेने धाव घेतली असता दोन दरोडेखारांनी तेथून दागिन्यांसह पळ काढला. रुपाराम याने पकडून ठेवलेल्या एका दरोडेखोराला घटनास्थळी दाखल झालेल्या कोळसेवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी रुपाराम याला उपचारांसाठी नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले असून या प्रकरणी तीन जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करून एकाला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. रोशनसिंग सीशोदिया असे अटक करण्यात आलेल्या एका दरोडेखोराचे नाव असून आसिफ पठाण आणि महेंद्रसिंह अशी पळून गेलेल्या दोघांची नावे आहेत.

अटक करण्यात आलेला दरोडेखोर आणि त्याचे सहकारी हे मूळचे राजस्थान येथे राहणारे असून लुटपाट करण्याच्या इराद्याने ते आले होते अशी माहिती समोर येत आहे. या दरोड्याच्या घटनेत सुमारे १० लाख रुपयांच्या दागिन्यांची लूट झाली असून इतर दोन्ही आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचे एका पथक त्याच्या मागावर पाठवण्यात आले असल्याची माहिती कोळसेवाडी पोलिसांनी दिली.