घरमुंबईभूमिगत पर्जन्य जलवाहिनीतील गाळ सफाईत ‘रोबो’ फेल

भूमिगत पर्जन्य जलवाहिनीतील गाळ सफाईत ‘रोबो’ फेल

Subscribe

मुंबई शहरातील जुन्या ब्रिटीशकालीन पावसाचे पाणी वाहून नेणार्‍या भूमिगत वाहिन्यांमधील (पर्जन्य जलवाहिनी) गाळाची सफाई यांत्रिक पध्दतीने ‘रोबो’च्या माध्यमातून करण्याचे लक्ष्य महापालिकेने ठेवले होते. प्रत्यक्षात मात्र रोबोच्या माध्यमातून कामाला सुरुवात झाल्यावर वर्षानुवर्षे साचलेल्या गाळाची सफाई करण्यात अडचणी येत आहेत.‘रोबो’च्या माध्यमातून गाळाची सफाई होत नसल्याने या गाळापुढे ‘रोबो’ फेल झाल्याचे दिसत आहे. आता या ‘रोबो’ प्रणालीत बदल करून सफाईची मोहीम पुन्हा जोमाने सुरू करण्याचा प्रशासन विचार करत आहे.

मुंबई शहर भागात भूमिगत पर्जन्य जलवाहिनी असून यापूर्वी याची सफाई मनुष्यबळाचा वापर करून केला जात होता. परंतु न्यायालयाने आदेश दिल्यामुळे या भूमिगत पर्जन्य जलवाहिन्यांची सफाई यांत्रिक पध्दतीने करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे यंदा मुंबईतील या वाहिन्यांची सफाई करण्यासाठी महापालिकेने ‘रोबो’चा वापर करण्याची अट घालून कंत्राट दिलेे. त्यानुसार शहरातील एकूण ७० किलोमीटर लांबीच्या वाहिन्यांपैकी २७ किलोमीटर लांबीची सफाई यंदाच्या पावसाळ्यात करण्यात येणार होती. परंतु यापैकी आतापर्यंत केवळ ६५० ते ७०० मीटर लांबीचीच सफाई झाली आहे.

- Advertisement -

या सर्व वाहिन्या शंभर वर्षे जुन्या आहेत. त्यामुळे त्यामध्ये मोठ्याप्रमाणात गाळ जमा झालेला असून ‘रोबो’या माध्यमातून सफाई करताना हे गृहीत धरण्यात आले नव्हते. त्यामुळे प्रत्यक्षात याद्वारे सफाई करताना त्याची योग्यप्रकारे सफाई होत नाही. त्यामुळे पावसाळापूर्व सफाईचे काम केवळ ७००मीटर एवढेच झालेले आहे. पर्जन्य जलविभागाचे प्रमुख अभियंते श्रीकांत कावले यांनी मात्र यावर भाष्य करण्यास नकार दिला.

‘रोबो’च्या कंत्राटदाराला दंड
मुंबईतील जुन्या पर्जन्य वाहिन्यांसह रेल्वे हद्दीतील कल्व्हर्टच्या साफसफाईसाठी महापालिकेच्यावतीने ‘रोबो’ची खरेदी करण्यात येत आहे. स्थायी समितीने मान्यता देवूनही ‘रोबो’ महापालिकेच्या सेवेत दाखल झालेला नाही. सहा महिने होवूनही ‘रोबो’ न आल्याने संबंधित कंत्राटदाराला १० टक्के दंड आकारण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मात्र, हा ‘रोबो’जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत महापालिकेच्या सेवेत दाखल होईल, असे बोलले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -