घरमुंबईशत्रूंचा शोध घेणार रोबो

शत्रूंचा शोध घेणार रोबो

Subscribe

प्रत्यक्ष सीमेरेषेवर लपून बसलेल्या शत्रूंची माहिती मिळणे अनेकदा सैन्यांना अडचणीचे ठरत असेत. सैन्यांना आपल्या जीवाची बाजी लावून सीमारेषेपर्यंत गस्त घालावी लागते. यामध्ये अनेकदा शत्रू सैन्यांकडून किंवा दहशतवाद्यांकडून होणार्‍या हल्ल्यामध्ये सैन्यांना प्राण गमवावे लागतात. त्यामुळे देशाचे मोठे नुकसान होते. सैन्याचे होणारे नुकसान टाळण्यासाठी नवी मुंबईतील नेरूळमधील रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी सीमेरेषा, जंगल, खंदकामध्ये लपून बसलेल्या शत्रूंचा शोध घेऊन त्यांना ठार मारणारा रोबो तयार केला आहे. हा रोबो पूर्णत: स्वयंचलित असून, कोणत्याही खडतर मार्ग सहज ओलांडून शत्रूपर्यंत पाहचू शकेल अशी त्यामध्ये व्यवस्था करण्यात आली आहे.

सामाजिक प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी विद्यार्थ्यांनी संशोधन करावे, यासाठी आयआयटी मुंबईतर्फे दरवर्षी ‘ई-यंत्रा’ ही स्पर्धा घेण्यात येते. या स्पर्धेमध्ये देशातील 21 कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी आपल्या प्रकल्पांचे सादरीकरण केले आहे. सध्या सीमेवर शत्रूंकडे वारंवार होत असलेल्या हल्ल्यामुळे सैन्यांचे मोठे नुकसान होत आहे. हे नुकसान टाळता यावे यासाठी नेरूळमधील रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी विशेष रोबो तयार केला आहे. रोबो पूर्णत: स्वयंचलित असून, त्यावर सॅटेलाईटच्या मार्फत नियंत्रण ठेवता येणार आहे. रोबोमध्ये बसवलेल्या कॅमेर्‍यामुळे किती शत्रू आहेत, त्यांच्याकडे कोणते साहित्य आहे, ते कोठे लपून बसले आहेत, अशी शत्रूची इत्यंभूत माहिती नियंत्रण कक्षाला उपलब्ध करून देणार आहे. शत्रूची सविस्तर माहिती मिळाल्यानंतर शत्रूविरोधात कोणती कारवाई करायची याची सॅटेलाईटद्वारे कक्षाकडून रोबोटला सूचना पाठवण्यात येतील.

- Advertisement -

नियंत्रण कक्षाकडून आलेल्या माहितीनुसार रोबो शत्रूविरोधात कारवाई करून त्यांना ठार मारेल. रोबोचे लक्ष्य इतके अचूक असणार आहे की, शत्रूंवर केलेल्या हल्ल्यामध्ये तो वाचण्याची शक्यता कमी असेल. सैन्यदलासाठी महत्त्वाचा असलेल्या रोबोमुळे प्रत्यक्ष सीमेवर गस्त घालताना सैन्याला शत्रूशी दोन हात करावे लागण्यापासून सुटका होणार आहे. सीमेवर गस्त घालणे, शत्रुंच्या हालचाली टिपणे, शत्रूच्या भागात शिरून त्यांच्यावर हल्ला करणे अशा महत्त्वपूर्ण बाबी हा रोबोट करणार असल्याने सैन्यासाठी हा रोबो महत्त्वपूर्ण ठरणार आहे. रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या मोहतीश चौधरी, जागृत जाधव, राहुल चंडोक आणि स्नेहल बोंड्रे यांनी हा रोबो बनवला आहे.

रोबो ओळखणे ठरणार अवघड
शत्रूच्या भागामध्ये शिरताना सैनिक ज्याप्रमाणे परिस्थितीनुसार ड्रेस घालतात. त्याप्रमाणे रोबोची ओळख शत्रूला होऊ नये यासाठी रोबोवर परिस्थितीनुसार आवरण बसवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे जंगलात कारवाई करण्यासाठी झाडेझुडपे, वाळवंटात कारवाई करताना खाकी रंगाचे आवरण बसवण्याची व्यवस्था असल्याने तो पटकन शत्रूच्या नजरेत येणार नाही. तसेच शत्रूच्या रडारवर तो येऊ नये यासाठी त्यामध्ये व्यवस्था करण्यात आली आहे.

- Advertisement -

खडतर मार्गही करणार पार
रोबो शत्रूच्या भागामध्ये जात असताना येणारे अडथळे स्वत: दूर करत त्याला सहज मार्गक्रमणा करता यावी, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तो चढउतार सहज पार करतो. तसेच एखादा मोठा अडथळा आल्यास तो आपली दिशा बदलून किंवा पुन्हा मागे होऊन दुसर्‍या मार्गाचा अवलंब करण्याची व्यवस्था रोबोमध्ये करण्यात आली आहे. अशी माहिती जागृत जाधव या विद्यार्थ्याने दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -