धावपटू महिलेला सी लिंकवर चिरडले; लंडन मॅरेथॉनची सुरू होती तयारी

मुंबईः वरळी सी लिंकवर रविवारी झालेल्या अपघातात धावपटू महिलेचा मृत्यू झाला आहे. ही धावपटू महिला लंडन मॅरेथॉनची तयारी करत होती. सकाळी साडेसहा वाजता याचाच सराव करत असताना त्या महिलेला एका कारने चिरडले. त्यात तिचा मृत्यू झाला.

राजलक्ष्मी विजय, असे या धावपटू महिलेचे नाव आहे. त्या अल्टिस्ट टेक्नॉलॉजिस या टेक फर्मच्या सीईओ होत्या. २०२३ च्या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये त्या सहभागी झाल्या होत्या. राजलक्ष्मी या फिटनेस जागरुक होत्या. त्या जॉगर्स फोरमचा भागही होत्या. लंडनमध्ये मॅरेथॉन होणार आहे. त्याचा सराव त्या करत होत्या. रविवारी त्या पतीसोबत मॅरेथॉनचा सराव करत होत्या. त्या सी लिंकवर होत्या. त्यावेळी एक भरधाव ईलेक्ट्रीक कारने त्यांना चिरडले. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

या घटनेची माहिती राजलक्ष्मी यांच्या पतीला पोलिसांकडून फोनवरुन मिळाली. त्यावेळी ते दादर, शिवाजी पार्क येथे होते. तेही तत्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी इलेक्ट्रीक कार चालकाला अटक केली आहे. समर मर्चंट असे या कार चालकाचे नाव आहे. निष्काळजीपणे वाहन चालवणे, मृत्यूस कारणीभूत ठरणे या कलमांतर्गत मर्चंट विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलीस त्याची चौकशी करत आहेत. हा अपघात झाला तेव्हा कार वेगात होती असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. अपघातात कारच्या पुढच्या चुराडा झाला आहे. त्यामुळे हा अपघात किती भीषण होता याची कल्पना येऊ शकते.

दरम्यान, गेल्या वर्षी वरळी सी लिंकवर झालेल्या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर दहा जण जखमी झाले होते. एकाच वेळी चार गाड्यांचा हा अपघात झाला होता. अपघात झालेल्या गाड्यांमध्ये रुग्णवाहिकेचाही समावेश होता. वांद्रयाहून वरळीच्या जाणाऱ्या मार्गावर हा भीषण अपघात झाला होता. त्यामुळे एका बाजूची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. परिणामी सी लिंकवर काही काळ वाहतूककोंडी होती.