…याला ‘मदर जिहाद’ म्हणणार का? लालबाग हत्या प्रकरणावरून कॉंग्रेसच्या सचिन सावंतांचा भाजपवर निशाणा

या प्रकरणाला तुम्ही 'मदर जिहाद' म्हणणार का? अशा थेट सवालच सचिन सावंत यांनी भाजपाला केलाय.

Sachin Sawant

श्रद्धा वालकर प्रकरणामुळे भाजपकडून सातत्यानं लव्ह जिहादचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून लव्ह जिहादचा हा मुद्दा चांगलाच गाजत आहे. यावरुन आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मुंबईतल्या लालबागमधील एका मुलीने आपल्या आईची हत्या केल्याच्या घटनेचा दाखला देत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधलाय. भाजप आणि संघाचे लोक याला आता ‘मदर जिहाद’ म्हणणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

भाजपाकडून आंतरधर्मीय लग्नांकडे बोट करत वारंवार ‘लव्ह जिहाद’चा मुद्दा उपस्थित केला जात आहे. सध्या हा विषय विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही पोहचला. मंत्री मंगलप्रभात लोढांनी राज्यात १ लाख लव्ह जिहादची प्रकरणं झाल्याचा दावा केल्यानंतर हा विषय प्रचंड चर्चेत आलाय. हिंदू मुलींची फसवणूक करून मुस्लीम मुलं त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात आणि लग्न करून धर्मांतर करण्यास भाग पाडतात,’ असा काही भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दावा आहे. यालाच ते ‘लव्ह-जिहाद’ असं म्हणतात. लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून हिंदुत्ववादी संघटनांनी चांगलेच रान उठवले आहे.

अशात मुंबईत लालबागमध्ये एका २३ वर्षीय मुलीने स्वत:च्या आईची हत्या करून तिचे हात पाय मार्बल कटरने कापले आणि मृतदेह पॉलिथिन आणि कापडाने बांधून कपाटात ठेवला, तिचे हात आणि पाय कापून स्टीलच्या पाण्याच्या टाकीत ठेवले. गेल्या तीन महिन्यापासून तिने आपल्या आईचा मृतदेह घरात ठेवला होता. आरोपी मुलीने तिच्या आईच्या मृतदेहाचा दुर्गंध लपविण्यासाठी चक्क मेडिकल स्टोअरमधून १०० परफ्यूमच्या बाटल्या आणि एअर फ्रेशनर खरेदी केलं होतं. या घटनेनं मुंबई पुरती हादरली असून आता या हत्या प्रकरणाचा दाखला देत कॉंग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला टार्गेट केलंय.

ज्या प्रमाणे हिंदू मुलींची फसवणूक करून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्या हत्या प्रकरणाला लव्ह जिहाद म्हणता. मग आता मुलीने आपल्या आईची हत्या केलेल्या या प्रकरणाला तुम्ही ‘मदर जिहाद’ म्हणणार का? अशा थेट सवालच सचिन सावंत यांनी भाजपाला केलाय. त्यामुळे मुंबईला हादरवून सोडणाऱ्या या आईच्या हत्या प्रकरणावरून महाराष्ट्राचं राजकारणं तापणार, असं चित्र दिसतंय. लव्ह जिहाद हा नवीन जुना वाटत असला तरी या मुद्द्यावरून वेगवेगळं राजकारण रंगताना दिसत आहे. आतापर्यंत लव्ह जिहादचा मुद्दा उचलून धरलेल्या भाजपाला सचिन सावंत यांनी अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. आता यावर भाजप काय उत्तर देणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.