छत्रपती शिवाजी महाराजांच्या वक्तव्याने सचिन तेंडुलकरने जिंकली चाहत्यांची मने

मुंबईच्या दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे जाणता राजा या महानाट्याच्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार आशिष शेलार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले असून या प्रयोगांना अनेक दिग्गज व्यक्तींनी हजेरी लावली असतानाच आता सचिन तेंडुलकर याने सुद्धा या कार्यक्रमाला हजेरी लावली.

Sachin Tendulkar won the hearts of his fans with the statement of Chhatrapati Shivaji Maharaj

मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी दादर येथील शिवाजी पार्क येथे जाणता राजा या महानाट्याचे आयोजन केले आहे या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते तुळजाभवानीची पूजा करून या नाट्याच्या प्रयोगाला सुरुवात करण्यात आली होती. तर शनिवारी (ता. १८ मार्च) मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने या महानाट्याला हजेरी लावली होती.

शनिवारी जाणता राजा या महानाट्याचा पाचवा प्रयोग होता. यावेळी सचिन तेंडुलकर हा सुद्धा हे नाट्य पाहण्यासाठी आला. यावेळी सचिनने आपले मनोगत व्यक्त करताना म्हंटले की, “माझ्या शाळेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धड्याने झाली. त्यानंतर माझ्या क्रिकेटची सुरुवातदेखील छत्रपती शिवाजी महाराज मैदानातच झाली. छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील जाणता राजा हे महानाट्य डोळ्याचे पारणे फेडणारे आहे. या महानाट्याची अनुभूती घेतल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज की जय असे म्हटल्याशिवाय राहवत नाही.” त्याच्या या वक्तव्याने उपस्थित असलेल्या अनेक चाहत्यांची मने जिंकली.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असणाऱ्या जाणता राजा या महानाट्याच्या प्रयोगाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. आज (ता. १९ मार्च) या नाट्याचा शेवटचा सहावा प्रयोग सादर करण्यात येणार आहे. ‘जाणता राजा’च्या प्रयोगाची सुरुवात रोज तुळजाभवानीच्या आरतीने होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहिली आरती करण्यात आली होती. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गायिका उषा मंगेशकर यांनीही या महानाट्याला हजेरी लावली. आता शनिवारी सचिन तेंडुलकरने या ठिकाणी उपस्थित राहून प्रयोगाला शुभेच्छा दिल्या. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, दिग्दर्शक केदार शिंदे, अभिनेता अंकुश चौधरी, अभिनेत्री सना शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.


हेही वाचा – इंग्लंडमध्ये केलेल्या वक्तव्यावर राहुल गांधींनी संसदीय समितीच्या बैठकीत केली भूमिका स्पष्ट