Antilia case: सचिन वाझे यांना वोकहार्ट रुग्णालयात केले दाखल

Sachin Waze was declared a witness to the apology

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटक ठेवल्याप्रकरणी आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणी अटक केलेल्या सचिन वाझे यांना मुंबईतील वोकहार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सचिन वाझेंवर शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती त्यांच्या वकिलांकडून देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी सचिन वाझे यांना मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा देत खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी परवानगी दिली होती. या उपाचारदरम्यान वाझेंसोबत त्यांच्या पत्नीला राहण्याची मुभा देखील देण्यात आली आहे.

काल, रविवारी सचिन वाझे यांना त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना मुंबई सेंट्रल येथील वोकहार्ट रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांच्या वकीलांनी माध्यमांना दिली आहे. वाझेवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. दरम्यान माहितीनुसार, वाझे यांना मायनर हार्ट अॅक्ट येऊन गेल्याचे समोर आले आहे. परंतु जेल प्रशासनाकडून याला दुजोरा देण्यात आला नाही आहे.

एनआयएने सचिन वाझे यांना उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटक ठेवल्याप्रकरणी आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणी अटक केली आहे. सध्या ते एनआयएच्या कोठडीत आहेत. पण हृदयविकाराचा त्रास होत असल्यामुळे सचिन वाझे यांनी उपचारासाठी न्यायालयापुढे अर्ज सादर केला होता. तो स्वीकारत त्यांना भिवंडीतील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. परंतु आता त्या रुग्णालयात पुढील उपचार होणार नाही आहेत. त्यामुळे त्यांनी काही दिवसांपूर्वी पुन्हा मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात यावे, अशा आशयाचा अर्ज न्यायालयापुढे पुन्हा सादर केला होता. ९ सप्टेंबर रोजी या अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी झाली. मुंबईतील वोकहार्ट रुग्णालयात उपचारासाठी वाझेंना मुंबई सत्र न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे आज त्यांना वोकहार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


हेही वाचा – Kirit Somaiya: सोमय्यांनी हसन मुश्रीफांवर केलेले आरोप बिनबुडाचे – नवाब मलिक