घरताज्या घडामोडीAPI सचिन वाझे मुंबई पोलिस दलातून दुसऱ्यांदा निलंबित, सर्व्हीस रूल बुकचा नियम...

API सचिन वाझे मुंबई पोलिस दलातून दुसऱ्यांदा निलंबित, सर्व्हीस रूल बुकचा नियम काय ?

Subscribe

मनसुख हिरेन मृत्यू आणि अंबानी स्फोटक प्रकरणात आरोपी असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांचे मुंबई पोलिस दलातून दुसऱ्यांदा निलंबन झाले. मुंबई पोलिसांच्या अतिरिक्त पोलिस आयुक्त (विशेष ब्रॅंच) ने या प्रकरणात स्पष्टीकरण दिले आहे. मुंबई पोलिसांच्या प्रवक्त्यांनीही याबाबतची पुष्टी केली आहे. मुंबई पोलिस दलात दुसऱ्यांदा निलंबित होणारे सचिन वाझे हे एकमेव अधिकारी आहेत. सचिन वाझे यांना या संपुर्ण प्रकरणात शनिवारी रात्री नॅशनल इनव्हेस्टिगेशन एजन्सी (एनआयए) मार्फत अटक करण्यात आली होती. पोलिस कोठडीत २४ तास असणाऱ्या कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला सेवेतून निलंबित करण्यात येते, असा सर्व्हीस रूल बुकमधील नियम आहे. त्यानुसारच सचिन वाझे यांचेही निलंबन करण्यात आले आहे.

मुंबई पोलिस दलातील सीआययू युनिटचे प्रमुख असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय) सचिन वाझे यांना विशेष न्यायालयाने रविवारी दिलेल्या आदेशान्वये २५ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे सचिन वाझे यांचा यापुढचा मुक्काम हा एनआयए कोठडीत येत्या २५ मार्चपर्यंत असणार हे नक्की झाले आहे. एनआयएकडून जवळपास १४ दिवसांची कोठडी मागण्यात आली होती. पण कोर्टाने मात्र आगामी १० दिवसांचीच एनआयए कोठडी देण्यासाठीचे आदेश रविवारी दिले. अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणात मुंबई पोलिस दलातील सीआययू ब्रॅंचमध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक असलेल्या सचिन वाझे यांचा समावेश असल्याचे सांगतच त्यांच्यावर गुन्हा दाखल करून रविवारी उशिरा अटक करण्यात आली होती. मुंबई पोलिसांच्या आतापर्यंतच्या इतिहासात एकच अधिकारी दोनवेळा निलंबित होण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. सचिन वाझे यांचेच दुसऱ्यांदा निलंबन होण्याची वेळ या अंबानीच्या घरासमोरील स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओच्या निमित्ताने होणार आहे. याआधीच सचिन वाझे यांचे ख्वाजा युनूस एन्काऊंटर प्रकरणात १६ वर्षांपूर्वी निलंबन करण्यात आले होते.

- Advertisement -

काय नियम आहे सर्व्हीस रूल बुकचा

एखाद्या गुन्ह्यात अटक करण्यात आल्यानंतर २४ तास पोलिस कोठडीत काढणाऱ्या सरकारी नोकर किंवा अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची तरतूद सर्व्हीस रूल बुकमध्ये आहे. त्यानुसारच प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांसह सापडलेल्या स्कॉर्पिओच्या प्रकरणात सहभाग असल्याप्रकरणी सचिन वाझे यांनी एनआयएने शनिवारी अटक केली आहे. त्यानंतर आज रविवारी त्यांना विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले. विशेष न्यायालयाने सचिन वाझे यांची १० दिवसांची कोठडी एनआयएकडे दिलेली आहे. त्यामुळेच हा नियम सचिन वाझेंच्या बाबतीतही लागू पडतो. सचिन वाझे यांची एनआयए कोठडी आज म्हणजे रविवारपासून सुरू होत आहे. त्यामुळेच हाच नियम सचिन वाझे यांच्या बाबतीतही लागू झाला. मुंबई पोलिस दलात एकच पोलिस अधिकारी दुसऱ्यांदा निलंबित होण्याचा हा पहिलाच प्रकार असेल. रविवारी सुट्टी असल्यामुळेच सचिन वाझे यांच्या निलंबनाच्या बाबतीतला आदेश निघाला नव्हता. अखेर आज मुंबई पोलिस दलाकडून याबाबतची ऑर्डर निघालीच.

याआधी सचिन वाझे यांच्या निलंबानाचे हे आहे कारण

२ डिसेंबर २००२ रोजी घाटकोपर येथे बसमध्ये बॉम्बस्फोट झाले होते. यात दोण जणांचा मृत्यू झाला तर ३९ जण जखमी झाले होते. यावेळी आठजणांना अटक करण्यात आली होती. त्यात ख्वाजा युनूस (२७) या व्यवसायाने इंजिनियर असलेल्या तरूणाचाही समावेश होता. युनूस मूळचा परभणीचा होता पण दुबईत नोकरी करत होता. २५ डिसेंबर २००२ ला त्याला पकडण्यात आले होते. पोटा अंतर्गत त्यांना अटक करण्यात आले होते. ६ जानेवारीला घाटकोपर पोलीस ठाण्यात युनूससह अन्य तीनजणांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर युनूस कोणाला दिसलाच नाही. ७ जानेवारीला तो फरार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर चौकशीसाठी औरंगाबादला नेत असताना पोलिसांच्या गाडीला अपघात झाला. याच संधीचा गैरफायदा घेत युनूस तिथून पळून गेला. असा दावा पोलिसांनी केला.

- Advertisement -

मात्र, युनूसबरोबर असलेल्या त्याच्या साथीदाराने पोलिसांनी युनूसला नग्न करून बेदम मारहाण केल्याचे सांगितले. तसेच त्याच्या तोंडातून रक्त येत असतानाही त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे न्यायालयाला सांगितले.
त्यानंतर युनूसच्या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयाकडे हे प्रकरण सोपवण्याची विनंती केली. उच्च न्यायालयाने हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग केलं. सीआयडीच्या तपासात युनूसचा मृत्यू पोलीस कोठडीतच झाल्याचे समोर आले. तसेच उपलब्ध पुराव्यांच्या आधारावर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यासह तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर खटला दाखल करण्यात आला. त्यांच्यावर हत्या व पुराव्यांशी छेडछाड केल्याचा आरोप ठेवण्यात आला. २००४ साली वाझे यांच्यासह अन्य तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले. मात्र २०१८ नंतर याप्रकरणी सुनावणी झालीच नाही.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -