Sunday, May 16, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई मुंबईतल्या ४४५ पुलांचं सेफ्टी ऑडिट, रेल्वेमंत्र्यांची घोषणा

मुंबईतल्या ४४५ पुलांचं सेफ्टी ऑडिट, रेल्वेमंत्र्यांची घोषणा

अंधेरी पूल दुर्घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या रेल्वे प्रशासनाने मुंबईतल्या ४४५ रेल्वे पुलांचं सेफ्टी ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ही घोषणा केली आहे. गोखले पूल दुर्घटनेमध्ये ५ जण गंभीर जखमी झाले असून २ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

Related Story

- Advertisement -

अंधेरी पूल दुर्घटनेनंतर मुंबईतल्या पुलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. एल्फिन्स्टन पूल दुर्घटनेनंतरही अशाच प्रकारे प्रश्न निर्माण केले जात होते. त्यावेळीही मुंबईतल्या पुलांच्या सेफ्टी ऑडिटचा मुद्दा उपस्थित केला गेला. मात्र, तेव्हाच्या सेफ्टी ऑडिटची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसतानाही आता नव्याने मुंबईतल्या पुलांचे सेफ्टी ऑडिट केले जाणार आहे. अंधेरी स्थानकावरील गोखले पूल दुर्घटनेनंतर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी घटनास्थळाला भेट दिली. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. मुंबईतल्या एकूण ४४५ पुलांचं सेफ्टी ऑडिट करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा पियुष गोयल यांनी केली आहे.

मंगळवारी सकाळी अंधेरी स्थानकात मोठ्या संख्येने मुंबईकर लोकलची वाट पाहात असताना अचानक मोठा आवाज झाला. काही काळानंतर समोर आलं की गोखले ब्रिजचा एक मोठा हिस्सा कोसळला आहे. या घटनेनंतर आसपासच्या परिसरात मोठा गोंधळ उडाला. स्थानिक, स्थानकांवरचे प्रवासी आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना तातडीने बचावकार्य सुरू केले. संध्याकाळपर्यंत हाती आलेल्या वृत्तानुसार या दुर्घटनेमध्ये एकूण ५ जण जखमी झाले असून २ जणांची प्रकृती गंभीर आहे.

पालिकेने टोलवली जबाबदारी

- Advertisement -

मुंबईत वारंवार होणाऱ्या पुलांच्या दुर्घटनांमुळे मुंबईकरांचा प्रवास सुरक्षित होणार का? असा एक मोठा प्रश्न जाणकारांकडून उपस्थित केला जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुंबई महानगर पालिकेने रेल्वे प्रशासनाकडे जबाबदारी टोलवली. त्यामुळे रेल्वेमंत्री पियुष गोयल आता काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर संध्याकाळच्या सुमारास पियुष गोयल यांनी घटनास्थळाला भेट दिली.

६ महिन्यांत होणार सेफ्टी ऑडिट

यावेळी मुंबईतल्या एकूण ४४५ पुलांचं सेफ्टी ऑडिट करणार असल्याची घोषणा पियुष गोयल यांनी केली. कमिशनर ऑफ सेफ्टी यांच्यावर या सर्व प्रकाराच्या चौकशीची जबाबदारी सोपवण्यात आली असून येत्या १५ दिवसांमध्ये त्याचा अहवाल सादर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, मुंबई आयआयटीचे प्राध्यापक देवांग कक्कड यांच्यावर मुंबईतल्या रेल्वे ब्रिजचे सेफ्टी ऑडिट करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. येत्या ६ महिन्यांत हे ऑडिट पूर्ण होणार आहे.

मोटरमनला ५ लाखांचं बक्षीस

- Advertisement -

दरम्यान, अंधेरी स्थानकात ब्रिजचा हिस्सा कोसळण्याच्या अवघ्या काही क्षण आधी लोकल ट्रेन थांबवून प्रसंगावधान दाखवणारे मोटरमन चंद्रशेखर सावंत यांना ५ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. रेल्वेमंत्र्यांनीच ही घोषणा केली आहे. गोखले ब्रिज कोसळण्याच्याच वेळी सावंत चालवत असलेली लोकल त्याखालून जाणार होती. मात्र, ब्रिजचा एक हिस्सा कोसळत असल्याचे दिसताच चंद्रशेखर सावंत यांनी लोकलचा वेग कमी करत लोकल आधीच थांबवली. त्यांनी दाखवलेल्या या प्रसंगावधानाबद्दल हे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. त्याशिवाय या घटनेमध्ये जखमी झालेल्यांना १ लाखांची मदतही जाहीर करण्यात आली आहे.x

- Advertisement -