घरमुंबईसमीर वानखेडे आता अॅक्शन मोडवर, नवाब मलिकांविरोधात अॅट्रोसिटीची तक्रार

समीर वानखेडे आता अॅक्शन मोडवर, नवाब मलिकांविरोधात अॅट्रोसिटीची तक्रार

Subscribe

आर्यन खान क्रुझ ड्रग्सप्रकरणी (Aryan Khan cruise drugs case) चर्चेत आलेले समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना जात पडताळणी समितीकडून क्लिन चीट मिळाली आहे. त्यानंतर, आता समीर वानखेडे यांनी नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याविरोधात अॅट्रोसिटीचा (Atrocity) गुन्हा दाखल करण्याची फिर्याद गोरेगाव पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार, पोलिसांनी अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. (Sameer Wankhede now on action mode, atrocity complaint against Nawab Malik)

क्रुझ ड्रग्सप्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली होती. याप्रकरणी अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. दरम्यान, या प्रकरणात तत्कालीन मंत्री नवाब मलिक यांनीही समीर वानखेडेविरोधात जोरदार मोहीम उघडली होती. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. समीर वानखेडे यांनी जात बदलल्याचा दावा करत नवाब मलिक यांनी जात पडताळणी समितीकडे वानखेडेंविरोधात तक्रार केली. प्रशासकीय नोकरी मिळवण्यासाठी समीर वानखेडे यांनी खोटी जात सांगितल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. ते धर्माने मुस्लिम समाजातील असून प्रशासकीय नोकरीसाठी त्यांनी हिंदू महार हे जात प्रमाणपत्र दिले असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला होता.

- Advertisement -

दरम्यान, जात पडताळणी समितीने समीर वानखेडे यांना क्लिनचीट दिली आहे. त्यांच्या वडिलांनी मुस्लीम धर्म स्वीकारल्याचे कुठेही सिद्ध झालं नसल्याचं जात पडताळणी समितीने म्हटलं आहे. त्यामुळे त्यांनी सादर केलेले हिंदू महार हे जात प्रमाणपत्र वैध आहे, असा अहवाल जात पडताळणी समितीने दिला आहे. हा अहवाल सादर करताना समितीने ९१ पानी निकालपत्र दिले.

समीर वानखेडे यांना क्लिन चीट मिळाल्यानंतर त्यांनी नवाब मलिक यांच्याविरोधातच आता तक्रार दाखल केली आहे. गोरेगाव पोलिसांत त्यांनी अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात फिर्याद दिली होती. त्यानुसार नवाब मलिक यांच्याविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. यापुढील तपास आता गोरेगाव पोलिसांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, नवाब मलिक सध्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तुरुंगात आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी पोलीस तुरुंगात जाऊन चौकशी करणार का हे पाहावं लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -