नाशिक : गृह विभागाने सोमवारी (20 नोव्हेंबर) 23 हून अधिक पोलीस उपायुक्त-पोलीस अधीक्षकांच्या अंतर्गत बदल्या केल्या होत्या. या घटनेला काही तास उलटत नाही तोच मंगळवारी (21 नोव्हेंबर) नाशिकचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची तडकाफडकी बदली करत त्यांची राज्याच्या गुप्तवार्ता विभागात विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी पुणे शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची नाशिक शहराच्या पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. गृह विभागाचे अवर सचिव स्वप्निल गोपाल बोरसे यांनी संदीप कर्णिक आणि अंकुश शिंदे यांच्या बदलीचे आदेश जारी केले आहेत. (Sandeep Karnik is the new police commissioner of Nashik)
अंकुश शिंदे 13 डिसेंबर 2022 रोजी नाशिकचे पोलीस आयुक्त म्हणून रूजू झाले होते. त्याआधीचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांची 9 महिन्यांतच बदली करण्यात आली होती. मुंबई, पुणे पोलिसांनी नाशिकमधे येत गुन्हेगारी आणि ड्रग्ज प्रकरणात कारवाई केल्यानंतर नाशिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर अंकुश शिंदे यांची 10 महिन्यांतच पुन्हा बदली करण्यात आली आहे.
हेही वाचा : कधीकाळी कमळासोबत वाघ होता; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला
कर्णिक गोळीबार प्रकरणामुळे वादात
नाशिकचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्त झालेले संदीप कर्णिक पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक असताना मावळमधील शेतकर्यांवर करण्यात आलेल्या गोळीबारामुळे वादात सापडले होते. 9 ऑगस्ट 2011 रोजी झालेल्या या गोळीबारात एका महिलेसह 3 शेतकर्यांचा मृत्यू, तर 14 शेतकरी जखमी झाले होते.
जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषींची बदली
जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषीना यांची पुणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. सोमवारी राज्यातील पाच महत्वाच्या पोलीस अधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये नागपूरचे नक्षल विरोधी अभियानाचे पोलीस अधीक्षक विशाल सिंगुरी यांची अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक पदी बदली करण्यात आली आहे. तर धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय ए.बारकुंड यांची महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या पोलीस अधीक्षकपदी, पुणे लोहमार्ग पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांची धुळे पोलीस अधीक्षकपदी, तर महाराष्ट्र राज्य सायबरचे पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांची अपर पोलीस अधीक्षक सोलापूर (ग्रामीण)चा पदभार देण्यात आला आहे.