राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचे संबंध पिता-पुत्राचे – संजय राऊत

sanjay raut meet governor bhagatsingh koshyari

एकीकडे राज्यात शिवसेना विरूद्ध राज्यपाल असं काहीसं चित्र निर्माण झालेलं असतानाच आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अचानक घेतलेली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. सामनाच्या अग्रलेखातून किंवा आपल्या ट्वीटर हँडलवरून संजय राऊत यांनी वारंवार राज्यपालांना लक्ष्य केल्याचं गेल्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळालं आहे. शिवाय, महाविकासआघाडीच्या सत्तास्थापनेच्या वेळी देखील राज्यपाल आणि शिवसेनेमधले संबंध ताणले गेले होते. आज मात्र संजय राऊत यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर दिलेली प्रतिक्रिया सगळ्यांनाच अचंबित करणारी होती. ‘राज्यपाल आणि मुख्यमंत्री या दोघांचे संबंध मधुर आहेत. दोघांना एकमेकांशी आदर आहे. त्यांचे पिता-पुत्रासारखे संबंध आहेत. त्यांच्यात दरी वगैरे पडत नाही’, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

‘राज्यपाल आमचे मार्गदर्शक’!

यावेळी संजय राऊत यांनी नेहमीच्या आक्रमक शैलीऐवजी राज्यपालांचं कौतुक केल्यामुळे देखील सगळ्यांना आश्चर्य वाटलं. ‘राज्यपाल आमचे मार्गदर्शक आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून मी त्यांना भेटलो नव्हतो. त्यामुळे ही फक्त एक सदिच्छा भेट होती. त्यापलीकडे काहीही नाही. राज्यपाल हे सगळ्यांना प्रियच असतात. ते राज्याचे पालक आहेत. घटनात्मक प्रमुख आहेत. विरोधक कायम इथे भेट देत असतात. विरोधी पक्षनेत्यांचं दालन किंवा बंगला राजभवन परिसरात असावा, असं म्हटलं म्हणजे ती राजभवनावर टीका होत नाही’, असं यावेळी राऊत म्हणाले आहेत.

राऊत-राज्यपाल भेटीचा फोटो चर्चेत!

दरम्यान, संजय राऊत यांनी राज्यपालांना भेटल्यानंतर त्यांना कंबरेत ९० अंशाच्या कोनात वाकून नमस्कार केल्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. राज्यपालांवर सातत्याने टीका करणारे संजय राऊत राज्यपालांसमोर अशा पद्धतीने वाकून नमस्कार करतात, यावर सोशल मीडियावर तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहेत.


वाचा सविस्तर – २० टक्क्यांच्या नेत्याला मुख्यमंत्री करणाऱ्या राज्यपालांची संजय राऊत यांना आठवण का झाली?