अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी संजय राऊतांच्या वक्तव्यावरुन गदारोळ झाला. त्याचे पदसाद आजही उमटू लागले आहेत. ‘विधिमंडळ चोर मंडळ’ असल्याचे विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलं. त्यावरून आता नवनव्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्यात. राऊत यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणण्याची मागणी विधानसभेत जोर धरू लागली असतानाच संजय राऊत यांनी पुन्हा यावर आणखी एक वक्तव्य केलंय.
संजय राऊत यांच्या वक्तव्यावरून आता विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी पहायला मिळतेय. संजय राऊत यांनी केलेलं हे वक्तव्य भोवण्याची शक्यता दिसत असतानाच संजय राऊत यांनी आणखी एक नवं ट्वीट रिट्वीट केलंय. चोर हा शब्द कायम ठेवत त्यांनी आणि पुढचं वक्तव्य केलंय. संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून एक ट्वीट रिट्वीट केलंय. “चोरमंडळ म्हणून यांच्यासोबत तुलना केली या रागात खरंतर चोरांनीच हक्कभंग दाखल करायला पाहिजे अशी सध्याची स्थिती आणि दर्जा आहे. चोर असो की अंडरवर्ल्ड.. त्यांचेसुद्धा काही नीती नियम असायचे.. जबान दी है याला कराराचा दर्जा असतो.धंदा आपल्या जागी ठेवतात, कुटुंब मध्ये आणत नाहीत.” असं या ट्वीटमध्ये लिहिण्यात आलंय.
चोरमंडळ म्हणून यांच्यासोबत तुलना केली या रागात खरंतर चोरांनीच हक्कभंग दाखल करायला पाहिजे अशी सध्याची स्थिती आणि दर्जा आहे🙂
चोर असो की अंडरवर्ल्ड.. त्यांचेसुद्धा काही नीती नियम असायचे.. जबान दी है याला कराराचा दर्जा असतो.धंदा आपल्या जागी ठेवतात, कुटुंब मध्ये आणत नाहीत.
— Prashant Kadam (@_prashantkadam) March 1, 2023
संजय राऊत यांच्या याच वक्तव्यावरून शिवसेना आणि भाजप हक्कभंग आणण्याच्या तयारीत आहेत. यासाठी मविआमधीलही नेत्यांनीही सत्ताधाऱ्यांना यासंदर्भात सहमती दर्शवली होती. त्यानंतर ‘विधीमंडळात चोर मंडळ गेलं असं मी म्हटलं. ते खरंय. शिवसेना चोरणं, धनुष्यबाण चोरणं ही सगळ्यात मोठी चोरी आहे. लोकांच्या भावना चोरणं. काय करायचं ते करू द्यात, आपण पाहू, असं वक्तव्य राऊत यांनी केलं.
यापूर्वी संजय राऊत यांनी सभागृहातील महिलांना वेश्या असं देखील म्हटलं होतं. आता त्यांनी विधिमंडळाला चोरमंडळ म्हटलंय. त्यामुळे अशी वक्तव्य करणाऱ्या संजय राऊंतावर हक्कभंगाची कारवाई व्हायलाच हवी अशी मागणी जोर धरू लागली आहे.