तुरुंग भोगलाय, हक्कभंगाला घाबरत नाही; संजय राऊतांनी ठणकावलं

संजय राऊतांच्या वक्तव्यावर सखोल चौकशी करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. यासंबधी हक्कभांगाचा निर्णय 8 मार्चला देण्यात येईल असं त्यांनी सांगितलं आहे. यावर आता संजय राऊतांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Sanjay-Raut-On-Privilege-Motion
संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्र विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस होता. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाला चोरमंडळ म्हटल्यानं त्यांच्या वक्तव्याचे पडसाद सभागृहात उमटले. संजय राऊतांच्या वक्तव्यावर सखोल चौकशी करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. यासंबधी हक्कभांगाचा निर्णय ८ मार्चला देण्यात येईल असं त्यांनी सांगितलं आहे. यावर आता संजय राऊतांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “हक्कभंग आणल्यास त्याला सामोरं जाईल. तुरूंगात गेलोय, हक्कभंगाला घाबरणार नाही” असं संजय राऊत यांनी म्हटलंय.

“हे विधिमंडळ नाही, चोरमंडळ आहे, असं विधान करणं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत पुन्हा एकदा अडचणीत येणार असं चित्रं आहे. कारण संजय राऊत यांच्या या विधानाचे विधानसभेत गदारोळ झाला असून राऊत यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी भाजप आणि शिंदे गटाकडून करण्यात आली. विधिमंडळात संजय राऊतांविरोधात यावरुन घोषणाबाजी झाली आणि सभागृहाचे कामकाज अनेकवेळा तहकूब करण्यात आले. संजय राऊत यांनी केलेल्या या विधानानंतर त्यांच्यावर हक्कभंग दाखल करण्यात आला आहे. संजय राऊतांच्या एका विधानाने विधानसभेत गदारोळ माजल्यानंतर संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधल्यानंतर प्रतिक्रिया दिलीय.

“माझं वक्तव्य समजून न घेता, भावना समजून न घेता एकांगी कारवाई करू नका. माझ्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. विधिमंडळाबाबत माझ्या भावना बहुमोल आहेत. शिवसेना आणि धनुष्यबाणाची चोरी करून काही लोक विधिमंडळात गेले, सरकार स्थापन केलं. विधिमंडळाच्या बाहेर त्यांचा उल्लेख ‘चोर’ असा केला जातो. बच्चू कडूंनाही काही लोकांनी अडवलं. चोरी करून ते विधिमंडळात गेले. या आधारे ज्यांनी बाळासाहेबांचं स्वप्न आणि धनुष्यबाण चोरलं मी त्यांना उद्देशून हे वक्तव्य केलंय.” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

यापुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, जर ते आमदार आहेत, तर मी खासदार आहे. ते ही तुमच्यापेक्षा जास्त काळ आहे. या चोरमंडळाने विधिमंडळाला हायजॅक केलंय. मी माझ्या आयुष्यात कधी घाबरलो नाही. न घाबरता मी तुरूंगवास पत्कारला. तर मी यांना काय घाबरणार? ” असं देखील संजय राऊत म्हणाले. तसंच महागाई, बेरोजगारी, वीजेचा प्रश्न, कायदा सुव्यवस्था आणि खोक्याच्या राजकारणापासून लोकांचं लक्ष विचलीत करण्यासाठी मला टार्गेट करण्याचा शिंदे-फडणवीस सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय.