राज ठाकरेंच्या ‘त्या’ व्हिडीओला खासदार संजय राऊतांनी दिले उत्तर, म्हणाले….

राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंचा एक जुना व्हिडीओ शेअर केला होता. यात बाळासाहेब ठाकरे भोंग्यांच्या मुद्द्यावर भूमिका मांडताना दिसत आहेत. याला आज पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Sanjay Raut responds to Balasaheb Thackeray's video shared by Raj Thackeray
Sanjay Raut responds to Balasaheb Thackeray's video shared by Raj Thackeray

मुंबई – मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्यावर मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी दिलेला 3 मेचा अल्टिमेटम संपल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर आंदोलने सुरू केली आहेत. याबाबत राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंचा एक जुना व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला होता. याला आज पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

या व्हिडीओमध्ये बाळासाहेब ठाकरे भोंग्यांच्या मुद्द्यावर भूमिका मांडताना दिसत आहेत. ज्या दिवशी माझं सरकार या महाराष्ट्रामध्ये येईल, त्यावेळेला रस्त्यावरील नामाज पठण बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. कारण धर्म असा असावा लागतो की तो राष्ट्रविकासाच्या आड येता कामा नये. लोकांना त्याचा उपद्रव होता कामा नये. आमच्या हिंदू धर्माचा कोणाला उपद्रव होत असेल त्याने येऊन मला सांगाव, आम्ही त्याचा बंदोबस्त करायला तयार आहोत. मशिदीवरील लाऊडस्पीकर्स खाली येतील, अशी भूमीका बाळासाहेब ठाकरे या व्हिडीओत मांडत आहेत.

 

यावर बाळासाहेबांचे जुने काय प्राचीन व्हिडीओ जरी टाकले, तरी आम्हाला बाळासाहेबांविषयी कुणी सांगण्याची गरज नाही. त्यांनी पुन्हा पुन्हा बाळासाहेब तपासले पाहिजेत. शिवसेना प्रमुखांच्या भूमिकांचा आणि विचारांचा इतिहास आमच्यासारख्यांना कुणी सांगण्याइतके आम्ही अजून खाली घसरलेलो नाही. आमचा श्वास बाळासाहेबांच्या विचारांनीच चालतो. आम्हाला काय सांगता? असे संजय राऊत म्हणाले.