Homeक्राइमSanjeev Jaiswal : म्हाडा उपाध्यक्ष जैस्वाल यांच्यावर गुन्हा, निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाने केले...

Sanjeev Jaiswal : म्हाडा उपाध्यक्ष जैस्वाल यांच्यावर गुन्हा, निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाने केले गंभीर आरोप

Subscribe

म्हाडा उपाध्यक्ष संजीव जैस्वाल यांच्यावर एका निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाकडून गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले आहेत. तर या प्रकरणी खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

(MHADA Sanjeev Jaiswal) मुंबई : आयएएस अधिकारी संजीव जैस्वाल हे सध्या म्हाडाच्या उपाध्यक्षपदी कार्यरत आहेत. त्यामुळे म्हाडाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आहे. परंतु, याच संजीव जैस्वाल यांच्यावर एका निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाकडून गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले असून या प्रकरणी खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. निवृत्त पोलीस उपनिरीक्षक विजय चाळके यांनी संजीव जैस्वाल यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप केला आहे. तर जैस्वाल यांनी एन्काऊंटर करण्याची आणि पेन्शन बंद करण्याची धमकीही दिल्याचा आरोप चाळके यांनी केला. (Sanjeev Jaiswal MHADA vice-president retired sub-inspector of police leveled serious allegations)

समोर आलेल्या माहितीनुसार, निवृत्त पोलीस निरीक्षक विजय चाळके हे गुरुवारी, 26 डिसेंबरला म्हाडा कार्यालयात गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत इतर 12 व्यक्ती सुद्धा होत्या. पुनर्विकासात गेलेल्या घराचे भाडे न मिळाल्याने चाळके इतर 12 जणांसोबत म्हाडा उपाध्यक्ष संजीव जैस्वाल यांच्या भेटीसाठी गेले होते. यावेळी जैस्वाल यांच्यासह म्हाडा कार्यालयातील दालनाबाहेर असलेल्या काही सुरक्षाक्षकांनी चाळके यांना शिवीगाळ करत मारहाण केली. यावेळी जैस्वाल यांनी गळ्यातील चैन आणि हेडफोन तोडल्याचा आरोपही चाळके यांच्याकडून करण्यात आला आहे. तर, धक्कादायक बाब म्हणजे संजीव जैस्वाल यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना सांगून तुझा एन्काऊंटर करेन आणि पेन्शन बंद करेन, अशी धमकीही दिल्याचा गंभीर आरोपही निवृत्त पोलीस उपनिरीक्षक विजय चाळके यांनी केला आहे.

हेही वाचा… Ravindra Waikar : मुंबईत शिवसेना खासदार रवींद्र वायकरांच्या गाडीला अपघात; थोडक्यात अनर्थ टळला!

या घटनेनंतर या प्रकरणाची तक्रार खेरवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या तक्रारीत विजय चाळके यांनी म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धक्काबुक्की केल्याचे म्हटले आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जैस्वाल, मुंबईचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर आणि महिला वरीष्ठ अधिकाऱ्यांसोबत गैरवर्तन केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे खेरवाडी पोलिसांनी म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जैस्वाल व इतर 10 ते 12 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी खेरवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत. तर म्हाडाच्या अधिकाऱ्यांनीही विजय चाळके यांच्याविरोधात खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

म्हाडा कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन….

या घटनेच्या निषेधार्थ आता म्हाडाच्या कर्मचाऱ्यांकडून आज सोमवारी (ता. 30 डिसेंबर) लेखणी बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. या घटनेत ज्या पद्धतीने म्हाडाच्या महिला कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यात आली आहे, ज्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली आहे, ते निंदनीय आहे. त्यामुळे आज एकदिवसी बंद पुकारण्यात आल्याचे म्हाडा कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.


Edited By Poonam Khadtale