जेव्हा धरणग्रस्त कुलदेवता ५३ वर्षांनी हक्काच्या मंदिरात विराजमान होते…

साताऱ्यातील विस्थापित अंबा देवी झाली ठाणे जिल्ह्यात विराजमान

कोयना धरण बांधून राज्यातील नागरिकांना वीज, पाणी मुबलक प्रमाणात मिळावे. याकरीता आपल्या जमिनी शासनाला देऊन ठाणे जिल्ह्यात विस्थापित झालेल्या कोयना पुनर्वसन करंजवडे गावातील नागरिकांनी तब्बल त्रेपन्न वर्षानंतर पुनर्वसन गावात आपल्या कुलदैवत अंबा मातेचे सुंदर मंदिर बांधले. त्यानिमित्ताने मान्यवरांच्या उपस्थितीत उत्सवाचेही आयोजन केले होते.

..1953 साली सरकारच्या वतीने पाटण तालुक्यात कोयना धरण बांधणीच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. यामुळे या ठिकाणची आता पर्यंत तब्बल 99 गावे सरकारच्या वतीने इतर ठिकाणी विस्थापित करण्यात आली आहेत. त्यापैकीच एक करंजवडे गाव आहे. कोयना धरण बांधल्यावर येथील नागरिकांचे सातारा, पनवेल, ठाणे, रायगड या ठिकाणी सरकारने नागरिकांचे पुनर्वसन केले. यामध्ये करंजवडे गाव देखील होते. येथील गावातील ग्रामस्थ इ.. 1960 ला सातारा जिल्हा सोडून ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात राहण्याकरिता आले. गावातील कुलदेवतेची जुनी मंदिरे घरांसोबतच पाण्याखाली गेली. पण मूर्ती मात्र ग्रामस्थ आपल्या सोबत घेऊन आले होते.

नवीन पुनवर्सन वसाहतीत त्यांनी एक छोटेसे मंदिर बांधले. त्यानंतर इतकी वर्षे शासन दरबारी प्रकल्पग्रस्त दाखला, जमिनीकरिता फेर्‍या मारण्यात ग्रामस्थांची वर्ष गेलीत. परंतु संपुर्ण गावाला सांभाळत गावातील ज्येष्ठ ग्रामस्थांनी आपल्या कुलदैवताचे मंदिर बांधण्याचा निर्णय त्यावेळी घेतला होता. त्याची पूर्तता होण्यासाठी ५३ वर्षे लागली.

तब्बल त्रेपन्न वर्षानंतर हा क्षण आला आणि गावातील ग्रामस्थांनी सुंदर, भव्य असे अंबे मातेचे मंदिर 2019 या वर्षी उभारले. ग्रामस्थांची कुलदेवता पुन्हा एकदा पूर्वीच्याच दिमाखाने भव्य मंदिरात विराजमान झाली. मंदिर उभारणीनिमित्त ३ दिवसाच्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

पहिल्या दिवशी धार्मिक विधि, ढोल ताश्यांच्या गजरात मूर्ती नगर प्रदक्षिणा आणि कीर्तनाचे आयोजन केले होते. दुसर्‍या दिवशी गणेश पूजन, कलशावरोहण, मूर्ती प्राणप्रतिष्ठा तसेच संगीत भजन सामन्याचे आयोजन तर तिसर्‍या दिवशी सत्यनारायणाची महापूजा आणि मंदिराचे उदघाटन करण्यात आले.

या तीन दिवसीय कार्यक्रम प्रसंगी मोठ्या प्रमाणात गावातील ग्रामस्थ तसेच पाहुणे मंडळी उपस्थित होते. या उद्घाटन सोहळ्याचे विशेष परिश्रम अंबाबाई ट्रस्टचे अध्यक्ष तुकाराम कदम, उपाध्यक्ष चंद्रकांत कदम, सचिव सुनिल कदम, सहसचिव विश्‍वास कदम, खजिनदार अनंत कदम, चंद्रकांत कदम, विष्णु कदम, मनोहर कदम, रविंद्र कदम, शंकरराव कदम तसेच सर्व ट्रस्टचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी घेतले.