घरठाणेआंदोलनांचा शनिवार; राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ-विरोधात काँग्रेस-भाजपा-शिवसेना कार्यकर्ते रस्त्यावर

आंदोलनांचा शनिवार; राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ-विरोधात काँग्रेस-भाजपा-शिवसेना कार्यकर्ते रस्त्यावर

Subscribe

ठाणे : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याने त्यांच्या समर्थनार्थ ठाणे शहर काँग्रेस यांच्यासह युवक काँगेस कार्यकर्ते आज रस्त्यावर उतरले होते. शहर काँग्रेसने राहुल गांधींवर झालेल्या कारवाईचा निषेध नोंदवला, तर युवक काँग्रेसने ‘लोकशाहीची अंतयात्रा’ काढून कारवाईला जोरदार विरोध केला. तर दुसरीकडे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाचा अपमान केल्यामुळे त्याच्या विरोधात भाजपाने आंदोलन, तर शिवसेनेने (शिंदे गट) मोर्चा काढला. ही सर्व आंदोलने काही तासांच्या अंतराने एका पाठोपाठ झाल्याने शनिवार हा आंदोलनांचा ठरल्याचे पाहण्यास मिळाले.

ठाण्यात काँग्रेसची निदर्शने
सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर केंद्रातील भाजपा सरकारने त्वरित राहुल गांधी यांचे संसद सदस्य पदाचे निलंबन केले. याचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटत असताना ठाण्यातील काँग्रेसचे पदाधिकारी आज आक्रमक होत राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईचा निषेध व्यक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव व ठाणे काँग्रेस प्रभारी संतोष केणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून जोरदार निदर्शने केली. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या विरोधात व भाजपा सरकारच्या विरोधात जोरदार काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

- Advertisement -

युवक काँग्रेसने काढली लोकशाहीची अंतयात्रा
ठाणे शहर युवक काँग्रेसच्या वतीने राहुल गांधीवरील कारवाईच्या निषेधार्थ “लोकशाहीची अंतयात्रा” तिरडी घेऊन काढली. ती थेट ठाण्याच्या मुख्य जवाहर बाग स्मशानभूमीत नेली. याप्रसंगी ‘लोकशाही वाचवा… देश वाचवा…’ अश्या घोषणा युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या. या अंतयात्रेत मोठ्या प्रमाणात महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.

राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपाचे आंदोलन
ओबीसी समाजाचा अपमान केल्याबद्दल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविरोधात ठाण्यातील कोर्ट नाका येथे शनिवारी भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक मिलिंद पाटणकर, मनोहर डुंबरे, संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी ओबीसी व समाजाचा भाग असलेल्या तेली समाजबांधवांचा अपमान केल्यामुळे राहुल गांधींनी शिक्षा भोगावी, अशी मागणी भाजपाकडून करण्यात आली.

- Advertisement -

शिवसेनेचा जाब विचारण्यासाठी मोर्चा
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाचा अपमान केला. त्या वक्तव्याचा जाब विचारण्यासाठी शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) समन्वयक तथा प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील आनंद आश्रम येथून ठाणे काँग्रेस कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मात्र पोलिसांनी मोर्चा मधेच अडवला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. तसेच राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -