घरCORONA UPDATECoronaVirus - महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांचा रक्तदानासाठी पुढाकार!

CoronaVirus – महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांचा रक्तदानासाठी पुढाकार!

Subscribe

शीव रुग्णालयात पाच अधिकारी,जवानांनी केले रक्तदान

मुंबईतील अनेक रक्तपेढ्यांमध्ये सध्या रक्ताचा साठा कमी होत असल्याने राज्य सरकार तसेच विविध संस्थांच्या माध्यमातून रक्तदान करण्याचे आवाहन केले जात आहे. या आवाहनाला महापालिकेची अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या सुरक्षा खात्यातील जवान आणि अधिकाऱ्यांनी प्रतिसाद देत रक्तदानाचे कर्तव्यही पार पाडले. महापालिकेच्या सर्व  रुग्णालयांमध्ये जागता पहारा देणाऱ्या या सुरक्षा विभागाने ‘करोना’च्या या आजाराचा सामना करण्यासाठी स्वत:पासून रक्तदानाच्या या मोहिमेत सहभाग नोंदवत एका जबाबदार नागरिकाची भूमिका बजावली आहे.

- Advertisement -

मुंबईसह देशात करोनाच्या पार्श्वभूमीवर  सर्व लॉकडाऊन  आहे. मात्र, या साथीच्या आजाराच्या भीतीने रक्तदानाचे प्रमाण कमी झाले आहे. परिणामी मुंबईसह राज्यातील रक्तपेढ्या्ंमध्ये रक्तांचा तुडवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. अनेक रुग्णांवर होत असलेल्या मोठ्या शस्त्रक्रिया, प्रसुती तसेच अपघात आदींमध्ये रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासते. त्यामुळे करोनामुळे रक्तदान न झाल्यास अनेक रक्तपेढ्यांमध्ये रक्त पिशव्यांचा तुडवडा निर्माण होवून पर्यायाने रुग्णांच्या तातडीच्या शस्त्रक्रियांवर परिणाम होवू शकतो. त्यामुळे राज्य सरकारने रक्तदान करण्याचे आवाहन करत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात परवानगी दिली आहे. त्यानुसार श्री सिध्दी विनायक न्यासाने पुढाकार घेत रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ज्या दात्यांना रक्तदान करायचे आहे, त्यांनी न्यासाच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचेही आवाहन केले आहे.

त्यामुळे एका बाजुला सरकारच्या आवाहनाला संस्था प्रतिसाद देत असताना महापालिकेच्या रुग्णालयातही रक्तदानाची मोहिम राबवली जात आहे. शीव येथील महापालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात महापालिकेच्या सुरक्षा खात्यातील सहायक सुरक्षा अधिकारी चौधरी यांच्यासह पाच जवानांनी रक्तदान करत या मोहिमेत सहभाग नोंदवला. शनिवारी या पाचही अधिकारी व जवानांनी रक्तदान केलेले असून रविवारी तसेच पुढील दिवसांमध्येही अशाचप्रकारे जवानांनी ऐच्छिकपणे रक्तदान करण्यासाठी आपली नावे नोंदवली आहे. रक्तदानाचा तुडवडा हे मुंबईसमोरील मोठे आव्हान असून एरव्ही अत्यावश्यक सेवा बजावताना महापालिकेच्या मालमत्तांचे रक्षण करणाऱ्या सुरक्षा रक्षकांनी आता देशावर आलेल्या संकटाच्यावेळीही रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी  रक्तदानाच्या मोहिमेत पुढाकार घेतला आहे. महापालिकेचे प्रमुख सुरक्षा रक्षक अधिकारी विनोद बाडकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आमचे विविध रुग्णालयातील जवान व अधिकारी संबंधित महापालिकेच्या  रुग्णालयांमध्ये रक्तदान करण्यासाठी तयार आहेत . त्यापैकी पाच अधिकारी व जवानांनी शीव रुग्णालयात रक्तदान केले आहे. सध्या करोना  विषाणुचा संसर्ग मोठ्याप्रमाणात पसरत असताना कस्तुरबासह केईएम,शीव, नायर तसेच उपनगरीय रुग्णालय, सेव्हन हिल्समध्ये सुरक्षा रक्षक तैनात आहेत. आपले कर्तव्य चोख बजावतानाच रक्तदानासारख्या मोहिमेतही ते सहभागी होत आहे, याचा मला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

हे ही वाचा – सोशल डिस्टन्सिंगने करोनाचा धोका ६२ टक्के कमी – आयसीएमआर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -