घरमुंबईसेल्फी, उत्साह आणि सामाजिक संदेश

सेल्फी, उत्साह आणि सामाजिक संदेश

Subscribe

उत्साह, सामाजिक संदेश आणि नाराजी, - पुन्हा एकदा धावली मुंबई, - १६ वी मुंबई मॅरेथॉनला उस्त्फूर्त प्रतिसाद

प्लॉस्टिक मुक्त मुंबई, स्त्रीभ्रूण हत्या, अवयव दान आणि वाढते प्रदूषण यासारखे अनेक सामाजिक संदेश देत मुंबईकर रविवारी पुन्हा एकदा धावले. निमित्त होते. १६ व्या मुंबई मॅरेथॉनचे. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईसह देशभरातील लक्ष वेधणार्‍या या मुंबई मॅरेथॉनच्या स्पर्धेत पुन्हा एकदा मुंबईकरांचा उत्साह शिगेला पोहचला होता. सेल्फीचा आनंद लुटत सामाजिक संदेश देणार्‍या या मॅरेथॉनमध्ये यंदा पुन्हा एकदा महिला आणि युवा वर्गांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला. परंतु यंदा वरळी येथील स्थानिकांनी वाहतुकीच्या मार्गात अचानक झालेल्या बदलामुळे आयोजनाचविरोधात तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

मुंबई मॅरेथॉनमधील ड्रीम रन ही मुंबईकरांच्या आर्कषणाचे केंद्रबिंदू. सहा कि.मी.च्या या ड्रीम रनमधील सहभागींचा भर हा स्पर्धेपेक्षा सामाजिक संदेश देण्यावर, नानाविध प्रकारची वेषभूषा परिधान करून लोकांचे लक्ष वेधून घेण्यावर जास्त असतो. रविवारच्या ड्रीम रनमध्येही ‘मुंबई स्पिरिट’चे उत्साही दर्शन पाहायला मिळाले. अनेकांनी आपापल्या कंपन्यांचे वेगवेगळ्या पद्धतीन प्रमोशन करीतत पब्लिसिटीचा फंडा अवलंबविला होता. काहीजणे पुणेरी फेटे, तर काहीजण आपल्या संस्थेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी एकाच रंगाचे टीशर्ट घालून या शर्यतीत धावण्यासाठी उतरले होते. काहींनी लेझीम आणि काहींनी पुणेरी ढोलवर ताल धरत या स्पर्धेची शोभा वाढविली.

- Advertisement -

स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी आलेल्या मुंबईकरांची संख्याही उल्लेखनीय होती. स्पर्धेचा उत्साह मोबाइलच्या कॅमेर्‍यात टिपण्यासाठी सगळ्यांची धडपड सुरू होती तर, अनेकजण मॅरेथॉनमधील ‘लक्षवेधी’ स्पर्धकांबरोबर सेल्फी काढण्यात गुंतले होते.

टाटा मुंबई मॅरेथॉनसाठी धावपटूंसह त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आलेल्या मुंबईकरांमध्ये उत्साहाचे वातावरण अगदी सकाळपासूनच पाहायला मिळाले. सकाळी मोजक्या प्रवाशांसह धावणार्‍या पश्चिम आणि मध्य रेल्वे रविवारच्या दिवशी मॅरेथॉनच्या निमित्ताने खचाखच भरुन धावत होत्या. काही हौशी कलाकारच नाही तर अगदी परदेशातून आलेले नागरीकही मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या धावपटूंना चिअर अप करण्यासाठी दाखल झाले. हेच चित्र दरवर्षीप्रमाणे यंदाही पाहायला मिळाले. फिटनेसच्या दृष्टीकोनातून मॅरेथॉनमध्ये दरवर्षी धावणार्‍या धावपटूंचा लोकांचा उत्साह वाखणण्याजोगा होता. तरुण-तरुणींपासून दिव्यांग ते ज्येष्ठ मंडळींपर्यंत सर्वच वयोगटातील रनर्सचा या मॅरेथॉनमध्ये सहभाग दिसून आला.

- Advertisement -

धावपटूंसोबतच अनेक सामाजिक संदेश देणारे लोक आणि संस्था देखील या मॅरेथॉनमध्ये सहभागी होत असतात. या सर्वांमध्ये सर्वात जास्त आकर्षण असते ते म्हणजे ड्रीम रनचे. ड्रीम रन म्हणजेच आपल्या स्वप्नांसाठी धावणे. या स्पर्धेत सर्वच वयोगटातील धावपटू सहभागी होतात. वयोवृद्ध ते राहुल बोस आणि तारा शहा यांच्यासारख्या सिनेसृष्टीत काम करणार्‍या कलाकारांपर्यंत सर्वच ड्रीम रनमध्ये धावतात. सकाळी ८ वाजताच्या दरम्यान ड्रीम रनला सुरुवात झाली. ड्रीम रनमध्ये अनेक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न मुंबईकर करतात. अवयवदान, दिव्यांग व्यक्ती ही सामान्य व्यक्तीच असते, तसेच एपिलेप्सी, सेलेब्रल पाल्सी या आजारांबाबतही संदेश दिला गेला. एपिलेप्सीबाबत समाजात जनजागृती व्हावी यासाठी एपिलेप्सीच्या रूग्णांनी स्वतः मॅरेथॉनध्ये सहभाग घेतला होता. मुंबईतील एपिलेप्सी फाऊंडेशनने पुढाकार घेतला होता.

गेल्या ९ वर्षांपासून एपिलेप्सी फाऊंडेशनकडून मॅरेथॉनमध्ये जनजागृतीचे कार्यक्रम राबवले जातात. यंदाच्या वर्षी एपिलेप्सी फाऊंडेशनमार्फत जवळपास २५० रूग्णांनी मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता. याशिवाय ४०० रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या रूग्णाला प्रोत्साहन दिले. मुंबई मॅरेथॉनच्या डिसॅबिलीटी रनमध्ये अनेक सामाजिक संस्थांचे दिव्यांग धावपटू सहभागी झाले. व्हिलचेअरमध्ये बसून धावणार्‍या धावपटूंची संख्या या रन सर्वात जास्त होती. मोहम्मद समीर नावाचे धावपटू पाय नसतानाही व्हीलचेअरवर बसून हाताच्या साहाय्याने धावत होते. अशा, ऑटीझम आणि शारीरिक दिव्यांग असलेल्या ७५ धावपटूंनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला होता. गेल्या ११ वर्षांपासून ते वेगवेगळ्या एनजीओमार्फत दिव्यांग धावपटू मॅरेथॉनमध्ये सहभाग घेत आहेत. ५ आणि साडेसात किलोमीटर एवढ्या अंतराच्या रनमध्ये हे दिव्यांग हजेरी लावतात.

अवयवदान आणि ब्रेस्ट कॅन्सरसाठी जनजागृती
देशात अवयवांच्या प्रतिक्षा यादीत लाखो लोक आहे. या रुग्णांचे जीव वाचवायचे असतील तर अवयवदानाचे महत्त्व प्रत्येक घराघरात पोहोचणे महत्त्वाचे आहे. अवयवदानाची जनजागृती मोठ्या प्रमाणात व्हावी, यासाठी काही एनजीओ आणि हॉस्पिटलच्या डॉक्टर्सनी पुढाकार घेतला होता. पालिकेच्या नायर हॉस्पिटलमधील विविध विभागात काम करणार्‍या १५ महिला डॉक्टर्सनी अवयवदान आणि ब्रेस्ट कॅन्सर या दोन महत्त्वाच्या विषयावर जनजागृती केली. मुंबईत २७ जणांना हृदय, ३९६ जणांना यकृत आणि ३ हजार ५६४ रुग्णांना किडनी हवी आहे. पण, जनजागृती नसल्याकारणाने लोक अवयवदानासाठी पुढे येत नाहीत. त्यासोबतच, ब्रेस्ट कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर अशा प्रकारच्या जनजागृतीसाठी नायर हॉस्पिटलच्या महिला डॉक्टर्स पहिल्यांदाच मॅरेथॉनमध्ये धावल्या. गेल्या एक महिन्यापासून या सर्व महिला डॉक्टर्स धावण्याची, चालण्याची प्रॅक्टिस करत होते. तसेच, अपेक्स किडनी फांऊडेशन आणि मानवता असोसिएशन यांनी देखील पुढाकार घेत अवयवदानासंदर्भात पथनाट्य सादर करत लोकांमध्ये जनजागृती पसरवण्याचा प्रयत्न केला.

फिटनेस ठेवणे हा आमचा उद्देश

मुंबई मॅरेथॉनच्या ज्येष्ठ नागरिकांच्या शर्यतीत अनेक ज्येष्ठ नागरिकही सहभागी झाले. तरुणांनाही लाजवेल असा उत्साह असलेले ज्येष्ठ नागरिक या मॅरेथॉनमध्ये आले होते. अगदी नाचत, धावत हे ज्येष्ठ नागरिक आपल्या वयाचा विचार न करता मॅरेथॉनचा आनंद घेताना दिसले. त्यापैकीच ७० वर्षीय रविंद्र खानविलकर, ६९ वर्षीय श्रीकांत ढवळे आणि ७१ वर्षीय दत्तात्रय जोशी हे तीन आजोबा सिनियर सिटीझन रनमध्ये सहभागी झाले होते. डोंबिवलीला राहणारे हे तिघेही मित्र गेल्या एका महिन्यापासून मॅरेथॉनसाठी प्रॅक्टीस करत होते. आपण फिट आहोत का? हे या मॅरेथॉनमध्ये चालल्यानंतर, धावल्यानंतर कळते, असे तिन्ही स्पर्धकांचे म्हणणे आहे.

‘मर्द को भी दर्द होता है, आज की स्वीटू, कल की मीटू’
त्यासोबतच आणखी एक आकर्षण ठरले ‘वास्तव फाऊंडेशन’ या संस्थेचे कार्यकर्ते. पुरुष आयोगाची स्थापना करा, या प्रमुख मागणीसाठी वास्तवचे कार्यकर्ते मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. ‘मर्द को भी दर्द होता है, आज की स्वीटू, कल की मीटू’ अशा घोषणांसहीत आम्हाला हवाय ‘पुरुष आयोग’ असा संदेश लिहिलेले फलक हाती घेऊन, ही पुरुष मंडळी मॅरेथॉनमध्ये आपल्या व्यथा सांगताना दिसले.

द्रविता धावली मुंबई मॅरेथॉन
रेल्वे अपघातात वाचून पायांवर ६ वेळा शस्त्रक्रिया केलेली कल्याणची द्रविता सिंग देखील ड्रिम रनमध्ये सहभागी झाली होती. यावेळेस तिच्यासोबत तिचे मनोबल वाढवण्यासाठी ज्या डॉक्टरांनी तिच्यावर ६शस्त्रक्रिया केल्या ते डॉ. शैलेश रानडे यांनी देखील सहभाग घेतला. दोन्ही पायांच्या तळव्यांवर ६ वेळा शस्त्रक्रिया करुन पायांवर उभी राहून मॅरेथॉनमध्ये धावलेल्या द्रविताचा उत्साह गगनात मावेनासा होता. ” मला खूप मस्त वाटतंय की मी मॅरेथॉनमध्ये पहिल्यांदाच धावले. शिवाय, डॉक्टरांनी दिलेल्या चॅलेंजमुळे मी हे करु शकले. जास्त जोरात नाही धावू शकत पण, जेवढे धावायला हवे तेवढे नक्कीच धावले, ” अशी प्रतिक्रिया द्रविता सिंगने दिली आहे.

एकूण ४६ हजार जणांनी घेतला सहभाग
आशियातली सर्वात मोठी मॅरेथॉन म्हणून मुंबई मॅरेथॉनचा उल्लेख केला जातो. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मुंबईत टाटा मुंबई मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. यावर्षी आयोजित केलेल्या मॅरेथॉनचे हे १६वे वर्ष होते. मॅरेथॉनमध्ये एकूण ४६ हजार ४१४ धावपटूंनी सहभाग घेतला होता. त्यात सर्वात आधी ४२ किलोमीटर म्हणजेच फूल रन, हाफ रन, पहिल्यांदाच सहभागी होणार्‍या धावपटूंसाठी १० किलोमीटरची स्पर्धा, एलिट रन, सिनियर सिटीझन, दिव्यांग आणि शेवटचे मुख्य आकर्षण म्हणजेच ड्रीम रन या स्पर्धांचा समावेश होता.

एकीकडे मुंबई मॅरेथॉनला मुंबईकरांचा उत्साह प्रतिसाद मिळत असताना यंदा पहिल्यांदाच वरळीतील काही स्थानिकांनी आयोजनाबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली. दादर ते वरळी मार्गावर अनेक वाहतुक मार्गात बदल केले. त्यामुळे रविवारी सकाळी घराबाहेर पडणार्‍या मुंबईकरांना तारेवरची कसरत करावी लागली. स्थानिकांना सकाळी ७ वाजल्यापासून वरळीतील सेंच्युरी बाजार, प्रभादेवी ते दादरपर्यंत ताटकळत उभे होते. लोकांनी ट्राफिक पोलिसांशी हुज्जतही घातली. पण आम्हाला ११ वाजेपर्यंत कुणालाही रस्त्यावरून जाऊ द्यायचे नाही, असे आदेश असल्याचे पोलीस सांगत होते. जर आमच्या कामात अडथळे आणले गेले तर कारवाई होईल, असंही पोलिसांकडून सांगण्यात आल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -