घरमुंबईआचारसंहिता भंगाच्या अ‍ॅपवर सेल्फींचा भडिमार

आचारसंहिता भंगाच्या अ‍ॅपवर सेल्फींचा भडिमार

Subscribe

जिल्हा प्रशासनाला डोकेदुखी, सी-व्हिजिल अ‍ॅप नव्हे सेल्फी अ‍ॅप

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जवळच येऊन ठेपल्या आहेत. सात टप्प्यांत देशात होणार्‍या निवडणुकीसाठी नागरिकांना निवडणूक आयोगाने यंदा काही हक्कही दिले आहेत. त्यामुळे आदर्श आचारसंहिता उल्लंघन करत असलेल्या नेत्यांविरुद्ध कोणताही नागरिक तक्रार करू शकणार आहे. तक्रारीनंतर 100 मिनिटांच्या आतमध्ये निवडणूक आयोग यावर कारवाई करणार आहे. तक्रारी मांडण्यासाठी निवडणूक आयोगाने ‘सी व्हिजिल अ‍ॅप’ सुरू केले आहे. मात्र, नागरिकांकडून या अ‍ॅपवर वैयक्तिक स्वरूपाच्या तक्रारी आणि फोटोंचा भडिमार होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

निवडणूक काळात आचारसंहिता उल्लंघनाचा प्रकार कुठे घडता कामा नये, जर उल्लंघन झालेच तर त्याची माहिती आयोगाला वेळीच मिळावी, यासाठी हे अ‍ॅप आहे. मात्र, अ‍ॅपवर वैयक्तिक स्वरूपाच्या तक्रारी नोंदवल्या जात आहेत.
या प्रकारामुळे ठाणे जिल्हा प्रशासन त्रस्त झाले आहे. ठाणे जिल्ह्यातील नागरिकांकडून अ‍ॅपवर 133 तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. यातील 47 तक्रारी ग्राह्य धरून त्यावर कारवाई करत असल्याची माहिती प्रशासनाने दिली. बाकीच्या 86 तक्रारी रद्द करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

‘सी व्हिजिल’ हे अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर मोबाईलधारक नागरिक सरळ निवडणूक आयोगासोबत जोडला जाणार आहे. भारतात होणार्‍या निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच लोकसभा निवडणुकीसाठी अशा पद्धतीचे अ‍ॅप लॉन्च करण्यात आले आहे. मोबाईलमध्ये हे अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर फोटो, व्हिडिओ काढण्याचे ऑप्शन दिसून येईल. त्यानंतर नाव, ठिकाणासह अन्य महत्त्वाची माहिती या अ‍ॅपद्वारे द्यायची आहे. तसेच मोबाईलवर ओटीपी आल्यानंतर संबंधित व्यक्तीचे या अ‍ॅपवर रजिस्ट्रेशन होणार आहे. आचारसंहिता लागू झाल्याने कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन करणार्‍या नेत्याचा फोटो किंवा व्हिडिओ तुम्हाला येथे अपलोड करता येणार आहे. याचा फायदा घेत अनेक नागरिक स्वतःच्या प्रसिद्धीसाठीच हे अ‍ॅप वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मूळ तक्रारीकडे दुर्लक्ष होण्याची भीती प्रशासनाने व्यक्त केली असून, यावर लवकरच पुन्हा एकदा जिल्हा प्रशासनाच्यावतीने जनजागृती मोहीम सुरू केली जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -