घरमुंबईCorona Vaccination : ज्येष्ठ नागरिकांचा लस घेण्यासाठी उत्साह; लसीकरण केंद्रावर उडाली झुंबड

Corona Vaccination : ज्येष्ठ नागरिकांचा लस घेण्यासाठी उत्साह; लसीकरण केंद्रावर उडाली झुंबड

Subscribe

मुंबईसह संपूर्ण राज्यामध्ये सोमवारपासून लसीकरणच्या तिसर्‍या टप्प्याला सुरुवात झाली.

देशातील ज्येष्ठ नागरिकांना १ मार्चपासून कोरोना लस देण्याच्या तिसर्‍या टप्प्याला सुरुवात झाली. आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाईन वर्कर्स यांचा अल्प प्रतिसाद मिळत असताना ज्येष्ठ नागरिकांनी मात्र लस घेण्यासाठी केंद्रांवर प्रचंड गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. सोमवारी सकाळी कोविन अ‍ॅपची लिंक सुरू होताच नागरिकांनी त्यावर नोंदणी करून तातडीने लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी रांगा लावल्या. लस घेतल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांच्या चेहर्‍यावरून आनंद ओसंडून वाहत होता. मुंबईसह संपूर्ण राज्यामध्ये सोमवारपासून लसीकरणच्या तिसर्‍या टप्प्याला सुरुवात झाली. यामध्ये ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेले ज्येष्ठ नागरिक आणि ४५ पेक्षा जास्त वय असलेले परंतु आजाराने त्रस्त असलेल्या नागरिकांना लस देण्यात येणार आहे.

आठ केंद्रांवर लसीकरण

मुंबई महापालिकेने पहिल्या दिवशी आठ केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था केली होती. यातील पाच केंद्रांवर मोफत आणि तीन केंद्रांवर सशुल्क लसीची व्यवस्था केली होती. मोफत लस असलेल्या पाच केंद्रांपैकी वांद्रेतील बीकेसी जम्बो कोविड सेंटरवर नागरिकांची प्रचंड गर्दी दिसून आली. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र प्रमुखांना पोलिसांची मदत घ्यावी लागली.

- Advertisement -

लस घेतल्यानंतर आनंद

हृदयरोगाने ग्रस्त असलेली ७९ वर्षीय इला मोदी यांच्यासाठी सोमवारचा दिवस फार महत्त्वाचा होता. कोरोना लसीचा त्या आतुरतेने वाट पाहत होत्या. कोरोनाची लस घेण्यासाठी सकाळपासूनच त्या तयार झाल्या होत्या. कोविन अ‍ॅपवर लिंक सुरू झाल्यानंतर त्यांनी तातडीने नोंदणी करून बीकेसीतील जम्बो कोविड सेंटरमध्ये हजेरी लावली. लस घेतल्यानंतर त्यांच्या चेहर्‍यावर मात्र आनंद ओसंडून वाहत होता.

लसीबाबत कोणतीही शंका नाही 

कोरोनामध्ये शेजारी, नातेवाईक हे तिर्‍हाईतपणे वागू लागल्याने अनेकांना मानसिक ताणाला सामोरे जावे लागले होते. मात्र सोमवारी वयोवृद्ध महिला आपल्या वृद्ध भावाला लसीकरणासाठी कोविड सेंटरवर घेऊन आली होती. कोरोनापासून आपला भाऊ सुरक्षित राहावा यासाठी मी माझ्यासोबत माझ्या भाऊ अनिल चंदोप याला घेऊन आल्याचे कमल चोपडा यांनी सांगितले. कोरोना केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांची गर्दी पाहून कोरोना लसीबाबत त्यांच्या मनामध्ये कोणतीही शंका नसल्याचे स्पष्ट झाले.

- Advertisement -

कोविन अ‍ॅपवर तांत्रिक अडचणी कायम

ज्येष्ठ नागरिकांनी कोरोना लस घेण्यासाठी उत्साह दाखवत कोविड सेंटरवर गर्दी केली. मात्र नोंदणी करताना कोविन अ‍ॅपवर येणार्‍या अडचणींचा पाढाही त्यांनी यावेळी वाचला. ८५ वर्षीय हंसराज असर यांचा मुलगा योगेशने कोविन पोर्टल ९ वाजता सुरू होणार होते. परंतु प्रत्यक्षात ते ११ वाजता सुरू झाले. मात्र त्यानंतरही त्यामध्ये नोंदणी करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

 

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -