ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचे निधन

इंडियन एक्स्प्रेस, लोकसत्ता, लोकमत, समूहात अनेक वर्षे पत्रकारिता केलेले ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. लोकमत वृत्तपत्र समूहात समन्वय संपादक म्हणून ते कार्यरत होते. मुंबईतील नानावटी रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रायकर यांच्यावर अंधेरीतील पारसीवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी आहे.

त्यांनी मराठी पत्रकारितेत ५० वर्षांहून अधिक काळ योगदान दिले. दिनकर रायकर यांना डेंग्यू आणि कोरोना झाला होता. उपचारानंतर डेंग्यू बरा झाला. मात्र, फुफ्फुसांचा संसर्ग झाला होता. गुरुवारी रात्री त्यांची आरटीपीसीआर निगेटिव्ह आली होती. मात्र, शुक्रवारी पहाटे त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. पहाटे तीन वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पत्रकारितेच्या क्षेत्रात मूल्यांचे जतन व्हावे आणि आधुनिक प्रवाह रूजावेत यासाठी योगदान देणारा संपादक गमावला, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिनकर रायकर यांना श्रद्धांजली वाहिली.

इंडियन एक्स्प्रेसमधून रायकर यांनी आपल्या पत्रकारितेची सुरुवात केली. मुंबईत राहायला घर नसल्याने ते एक्स्प्रेसच्या कार्यालयातच राहायचे. मेहनतीच्या जोरावर त्यांनी एक्स्प्रेसमध्ये डीटीपी ऑपरेटर, रिपोर्टर ते डेप्युटी एडिटर पदापर्यंत मजल मारली. लोकसत्तामधून निवृत्त झाल्यावर त्यांनी लोकमत समूहात समूह संपादकपदाची जबाबदारी सांभाळली. त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. कुणाच्याही मदतीला धावून जाण्याचा त्यांचा स्वभाव होता.

ते मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ तसेच मुंबई प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष होते. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या कृ.पा. सामक जीवनगौरव पुरस्काराने रायकर यांना सन्मानित करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाचा जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कारही त्यांना मिळाला होता. त्याशिवाय पुढारीकार ग.गो.जाधव पुरस्कार, सुशीलादेवी पत्रकारिता पुरस्कार, रोटरी इंटरनॅशनल पुरस्कार, कृषीवलकार प्रभाकर पाटील पत्रकारिता पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते.