ज्येष्ठ क्रीडा पत्रकार मुकुंद कर्णिक यांचे निधन

मुकुंद कर्णिक

ज्येष्ठ क्रीडा पत्रकार मुकुंद कर्णिक यांचे बुधवार सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी नयना आणि कन्या मुग्धा असा परिवार आहे. गेले काही दिवस ते मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त होते.

आपलं महानगर या दैनिकाच्या स्थापनेपासून पत्रकारितेत उतरलेले कर्णिक यांनी आपल्या कारकीर्दीची सुरूवात वर्तमानपत्र व्यवस्थापन आणि वितरणापासून केली. त्यानंतर १९९६ पासून त्यांनी क्रीडा पत्रकारितेला सुरुवात केली. मैदानात उतरून रिपोर्टिंग करण्याची आवड असणार्‍या कर्णिक यांनी पंधरा वर्षे आपलं महानगरमध्ये क्रीडा पत्रकारिता केली.

८०च्या दशकात क्रीडा विश्वात प्रसिद्ध असलेल्या षटकार या क्रीडा पाक्षिकाच्या निर्मितीची जबाबदारी कर्णिक यांनी दोन दशकांपेक्षा अधिक काळ सांभाळली. तसेच काही काळ त्यांनी दै. लोकमतच्या मुंबई आवृत्तीतही क्रीडा विभागात काम केले. अक्षर प्रकाशन आणि सदामंगल प्रकाशनच्या अनेक पुस्तकांची निर्मिती आणि वितरणाची जबाबदारीही त्यांनी पार पाडली होती.

क्रिकेट हा कर्णिक यांचा आवडता खेळ होता. त्यामुळे शालेय क्रिकेट आणि क्लब क्रिकेट खेळणार्‍या क्रिकेटपटूंना ते नावानिशी ओळखायचे. क्रिकेटच्या निमित्ताने त्यांनी भारतभर अनेक रणजी आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांचे वार्तांकन केले. क्रिकेट व्यतिरिक्त कबड्डी आणि खो-खो खेळांवर त्यांचे विशेष प्रेम होते. त्यांच्या अध्यक्षपदाखालीच मराठी क्रीडा पत्रकार संघाने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा २००६ साली ’सुवर्ण बॅट’ देऊन सत्कार केला होता.