घरCORONA UPDATECorona: कोरोनाच्या भीतीमुळे मुंबईत घरकाम करणाऱ्या महिलांना 'नो एंट्री'

Corona: कोरोनाच्या भीतीमुळे मुंबईत घरकाम करणाऱ्या महिलांना ‘नो एंट्री’

Subscribe

मुंबईत कोरोनाचा उद्रेक झालेला पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात ४२३ कोरोनाचे रुग्ण सापडले असताना त्यातील २३६ रुग्ण हे एकट्या मुंबईतच आहेत. मागच्याच आठवड्यात एक ६५ वर्षीय घरकाम करणारी महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आता मुंबईतील अनेक सोसायट्यांनी, गृहनिर्माण संस्थांनी घरकाम करणाऱ्या महिलांना सोसायटीत एंट्री देणे बंद केले आहे.

लॉकडाऊ जाहीर झाल्यानंतर मुंबईतील अनेक सोसायट्या, बंगले आणि चाळीतील रहिवाशांनी आपल्या घरात कामाला येणाऱ्या महिलांना सुट्टी देऊन टाकली आहे. काही लोकांनी या महिलांना आगाऊ पगार देऊन सुट्टी घ्यायला सांगितले आहे तर काही महिलांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

- Advertisement -

एका बाजुला सोसायट्यांमध्ये नो एंट्री असताना अनेक ठिकाणी घरकाम करणाऱ्या महिलांनीच स्वतःहून कामाला जाणे थांबवले आहे. काही दिवसांपूर्वीच परदेशातून आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यानंतर काही दिवसांनी त्याच्या घरात काम करणाऱ्या महिलेला देखील कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे काही महिलांनी स्वतःहून घरकामासाठी जाणे बंद केले आहे.

एका वृत्तसंस्थेला मुंबईत कुर्ला येथे राहणाऱ्या रुषीना मन्सुरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यात ती म्हणते की, “मी ज्या सोसायटीमध्ये काम करण्यासाठी जात होते, त्या इमारतीमधील एकाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मी स्वतःला आणि माझ्या कुटुंबाला धोक्यात टाकू शकत नाही. म्हणून त्या इमारतीमध्ये कामाला जाणेच बंद करुन टाकले आहे. आता रेशन दुकानावर जे सामान मिळेल, त्यावरच माझे कुटुंब अवलंबून आहे.”

- Advertisement -

मुंबई सारख्या न थांबणाऱ्या शहरात घरकामासाठी महिला मिळणे कठीण काम असते. घरातील सर्व सदस्य कामाला जात असल्यामुळे अनेक सधन कुटुंबात घरकामासाठी महिला किंवा गडी असतात. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे आता एकतर या लोकांना घरात घेतले जात नाहीये किंवा घरकाम करणाऱ्यांनीच कामाला जाणे बंद केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -