घरठाणेमुंब्र्यातील सहा कोटींच्या घबाडप्रकरणी तीन पोलीस अधिकार्‍यांसह सात पोलीस कर्मचारी निलंबित

मुंब्र्यातील सहा कोटींच्या घबाडप्रकरणी तीन पोलीस अधिकार्‍यांसह सात पोलीस कर्मचारी निलंबित

Subscribe

ठाणे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांचा मोठा दणका, आपलं महानगरने केला होता पोलिसांच्या धाडीचा पर्दाफाश, पोलीस उपायुक्त करणार चौकशी

काही दिवसांपूर्वी मुंब्रा पोलिसांनी एका व्यापार्‍याच्या घरावर मध्यरात्री टाकलेल्या धाडीत 30 कोटींची रोकड आढळून आली होती. या रोकडपैकी 6 कोटी रुपये उपस्थित पोलीस अधिकार्‍यांनी परस्पर काढून घेत संबंधित व्यापार्‍याला क्लीन चिट दिली होती. याबाबत काही दिवसांनी एक पत्र व्हायरल झाल्यानंतर प्रसारमाध्यमांमध्ये मुंब्रा पोलिसांच्या कामगिरीवर मोठ्या प्रमाणावर टीका होत होती. याबाबत दैनिक आपलं महानगरनेही सोमवारच्या अंकात या प्रकरणाचा भांडाफोड केला होता. अखेरीस याबाबत बुधवारी ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांनी एक पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक आणि सात पोलीस कर्मचार्‍यांना तत्काळ निलंबित करण्याची कारवाई केली. यामुळे ठाणे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

या खंडणीप्रकरणी तक्रारदाराने ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग तसेच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना एका पत्र पाठवले होते. या पत्रानुसार दिनांक 12 एप्रिल 2022 रोजी रात्री बारा ते साडेबारादरम्यान मुंब्रा पोलीस ठाण्याचे भूमी निरीक्षक शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक काळे, पोलीस उपनिरीक्षक मदने आणि आणखी तीन खासगी व्यक्ती पोलीस गाडीने मुंब्रा येथील बॉम्बे कॉलनीमधील फैजल मेमन यांच्या घरी रेड टाकण्यासाठी गेले. पोलिसांनी घातलेल्या धाडीमध्ये मेमन यांच्या घरात ३० कोटी रुपयांची रोकड सापडली. प्रत्येकी २ कोटीप्रमाणे १५ बॉक्समध्ये हे ३० कोटी रुपये बांधून ठेवण्यात आले होते. एवढी मोठी रोकड घरात सापडल्यामुळे हा काळा पैसा असून तुझ्यावर धाड पडेल आणि सर्व पैसा जप्त होईल, अशी भीती उपस्थित पोलीस अधिकार्‍यांनी मेमन यांना दाखवली. त्यानंतर हे सर्व पैसे जप्त करून मुंब्रा पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

- Advertisement -

मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या दालनामध्ये 30 कोटींचे हे 30 बॉक्स ठेवण्यात आले होते. तिथे मेमन यांना घेऊन गेल्यानंतर मात्र पोलीस अधिकार्‍यांनी त्यांना धमकावून प्रकरण दाबण्यासाठी पैसे मागण्यास सुरुवात केली. अखेरीस पोलिसांच्या दबावाला घाबरल्याने मेमन २ कोटी रुपये देण्यास तयार झाले. यावेळी पोलीस अधिकार्‍यांनी आम्ही २ कोटी यातून काढून घेतो आणि उरलेले पैसे तुला परत करतो, असे सांगितले, मात्र प्रत्यक्षात ३० कोटींमधून २ कोटींऐवजी ६ कोटी रुपये काढून घेतले आणि उरलेले 24 कोटी रुपये मेमन यांना परत केले. एवढे पैसे का घेतले, असे मेमन यांनी विचारण्याचा प्रयत्न केला असता पोलीस अधिकार्‍यांनी लाथा मारून त्यांना बाहेर काढले, असेदेखील या व्हायरल पत्रात म्हटले होते.

कोण आहे फैजल मेमन?
मुंब्रा बॉम्बे कॉलनी येथील घरावर धाड टाकण्यात आलेले फैजल मेमन हे मुंबईसह ठाणे, भिवंडीमध्ये लहान मुलांच्या खेळण्यांचे व्यापारी आहेत. तसेच ते भागीदारीमध्ये बांधकाम व्यावसायिकही आहेत, असे सांगण्यात आले. धाडीत त्यांच्या घरी पोलिसांना आढळलेल्या 30 कोटींपैकी 20 कोटी रुपये त्यांना चेकने आले होते. उर्वरित 10 कोटी अन्य मार्गाने आले होते, असेही सांगण्यात येते.

- Advertisement -

मुंब्रा पोलीस ठाण्यातील नेमणुकीतील खालील 3 पोलीस अधिकारी व 7 पोलीस अंमलदारांना निलंबित करण्यात आले आहे. सर्व नेमणूक मुंब्रा पोलीस स्तरी, सदर बाबतची प्राथमिक चौकशी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ -1, ठाणे यांचेकडे देण्यात आलेली आहे.

निलंबित पोलीस अधिकारी व कर्मचारी

1) पोनि/गीताराम शेवाळे
2) पोउपनिरी/रवि मदने
3) पोउपनिरी/हर्षल काळे
4) पोना/517 पंकज गायकर
5) पोना/ 7254 जगदिश गावित
6) पोना/113 दिलीप किरपण
7) पोना/ 1063 प्रवीण कुंभार
8) पोना/6981 अंकुश वैद्य
9) पोशि/2766 ललित महाजन
10) पोशि/7605 निलेश साळुंखे

छोटे मासे अडकले, बडे मासे मोकाट?
या घबाड प्रकरणात काही बडे पोलीस अधिकारीदेखील लाभार्थी असल्याची पोलीस वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा आहे. कारवाई करताना मात्र बड्या लाभार्थी माश्यांना वगळून छोट्या लाभार्थ्यांवर निलंबनाची कारवाई झाल्याने पोलिसांकडून नाराजी व्यक्त होत आहे. मोठ्या लाभार्थ्यांवर कारवाई करण्याची हिंमत गृहखाते दाखवणार का, असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे. कनिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना बळीचा बकरा केल्याचीही भावना आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -