Tuesday, February 23, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई सेक्सटॉर्शन करणार्‍या टोळीचा पर्दाफाश

सेक्सटॉर्शन करणार्‍या टोळीचा पर्दाफाश

राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी टार्गेट

Related Story

- Advertisement -

सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करून नंतर अश्लील व्हिडिओद्वारे सेक्सटॉर्शन करणार्‍या टोळीचा सायबर सेल पोलिसांनी पर्दाफाश केला असून तीन आरोपींना अटक केली आहे. या आरोपींची सुमारे 58 बँक खाती पोलिसांकडून गोठविण्यात आली आहेत. या टोळीने राज्यातील एका बड्या राजकीय नेत्यासह प्रशासकीय अधिकार्‍यांना टार्गेट केले असून कोलकाता, उत्तर प्रदेश, हरयाणा आणि राजस्थानात ही टोळी कार्यरत असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

गेल्या काही दिवसांत सायबर सेल पोलिसांकडे सेक्सटॉर्शनच्या बर्‍याच तक्रारी आल्या होत्या. त्याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत एका विशेष पथकाची नियुक्ती केली होती. या पथकाला राजस्थान, हरयाणा राज्यात पाठविण्यात आले होते. या पथकाने तिथे छापेमारी करून या टोळीच्या मुख्य आरोपीसह तिघांना अटक केली. त्यांच्या तपासात ते तिघेही सोशल मीडियावर सक्रिय होते. ते फेसबुक, गुगल, व्हॉट्स अ‍ॅप, टेलिग्रामचा वापर करीत होते. त्यांनी पूजा शर्मा, नेहा शर्मा या बोगस नावाने फेसबुकवर अकाऊंट सुरू केले होते. ज्यांच्या फेसबुक फ्रेंडलिस्टमध्ये जास्त सदस्य आहेत, जे फेसबुकवर नेहमी अ‍ॅक्टिव्ह आहेत, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती आहे अशा लोकांना टार्गेट करायचे. त्यांना फे्ंरण्ड रिक्वेस्ट पाठवून त्यांच्याशी मैत्री करायचे. त्यांना व्हिडिओ कॉल करून मोहात पाडून दृष्कृत्ये करण्यास प्रवृत्त करीत होते.

- Advertisement -

त्यानंतर ते अश्लील व्हिडिओ मॉर्फ करून ते व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करायचे आणि त्यांच्या नातेवाईक, मित्रांना पाठविण्याची धमकी देऊन पैशांची मागणी करत होते. पैसे दिले नाहीत तर त्यांची समाजात बदनामीची धमकी देत होते. सुरुवातीला संबंधित व्यक्तीकडे दोन ते पाच हजार रुपयांची मागणी केली जात होती. ही रक्कम बँक खात्यात जमा झाल्यानंतर ते लाखो रुपयांची मागणी करीत होते, या टोळीने आतापर्यंत काही राजकीय नेत्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तसेच इतर नामांकित व्यक्तींना गंडा घातला आहे. त्यांच्याकडून लाखो रुपये उखळल्याचे उघडकीस आले आहे.

विशेष म्हणजे रात्रीच्या वेळेस ते व्हिडिओ कॉल करून संबंधित व्यक्तींना त्यांच्या जाळ्यात अडकवित होते. आतापर्यंत या टोळीने 54 मोबाईलचा वापर केला असून काही ठराविक बँक खात्यात त्यांना पैसे ट्रान्स्फर करण्यास सांगण्यात येत होते. त्यांच्या 58 बँक खात्यात ही रक्कम जमा झाली असून त्यांनी आतापर्यंत 171 फेसबुक पेज, पाच टेलिग्राम चॅनेल्स तयार केले आहेत. अश्लील व्हिडिओ कसे बनवायचे यासाठी तीन दिवसांचे विशेष प्रशिक्षण आरोपींना देण्यात आले होते. ही टोळी कोलकाता, उत्तर प्रदेश, हरयाणा आणि राजस्थानात सक्रिय होती. तिन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून त्यांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात पोलिसांना यश आले आहे.

- Advertisement -