घरमुंबईअल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार सिनेअभिनेत्रीच्या हेअरड्रेसरला अटक

अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार सिनेअभिनेत्रीच्या हेअरड्रेसरला अटक

Subscribe

 

सोळा वर्षांच्या एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका सिनेअभिनेत्रीच्या हेअरड्रेसरला गुरुवारी खार पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. पॅटवन अ‍ॅलोस्टर डिगो असे या 42 वर्षीय आरोपीचे नाव असून तो मूळचा दक्षिण आफ्रिकेचा नागरिक असल्याचे पोलिसांनी सांगितले. विशेष म्हणजे ही सिनेअभिनेत्री एका बहुचर्चित चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून काम करीत असून तिच्याच सेटवर पॅटवन डिगोला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्याविरुद्ध अनैसर्गिक लैंगिक अत्याचारासह बाललैंगिक प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर त्याला शुक्रवारी येथील विशेष सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते, यावेळी त्याला 1 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

- Advertisement -

पिडीत मुलगा सोळा वर्षांचा आहे. तो सोशल साईटवर अ‍ॅक्टिव्ह असताना समलैंगिक संबंधांचा प्रसार करणार्‍या संकेतस्थळावर त्याची काही अज्ञात व्यक्तींशी ओळख झाली होती. त्यांच्यात एकमेकांविषयी आकर्षण निर्माण झाले होते. संबंधित व्यक्ती पिडीत तरुणाच्या संपर्कात राहून त्याच्याशी संभाषण करीत होते. अनेकदा तो त्यांना आपल्या घरी बोलावित होता. घरात कोणीही नसताना त्याच्यावर एकपेक्षा अधिक व्यक्तींनी अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला होता.

जून महिन्यात त्याची आई अचानक घरी आल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला होता. घडलेला प्रकार त्याने त्याच्या आईला सांगितल्यानंतर तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर त्याच्या आईने एका सामाजिक संस्थेच्या मदतीने खार पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठ अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेत संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश खार पोलिसांना दिले होते. त्याच गुन्ह्यात आतापर्यंत सात आरोपींना सात पोलिसांनी अटक केली आहे. त्यात काही बड्या व्यापार्‍यांचा समावेश आहे.

- Advertisement -

या गुन्ह्यात पॅटवन डिगो याचा सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर त्याला कर्जतच्या एका चित्रपटाच्या सेटवरुन गुरुवारी खार पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याची रात्रभर पोलिसांकडून चौकशी सुरु होती. नंतर पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपी हा वांद्रे येथील पाली हिल रोडवर राहत असून मूळचा दक्षिण आफ्रिकन नागरिक आहे. गेल्या काही वर्षांपासून तो मुंबई शहरात वास्तव्यास आहे. सध्या तो एका प्रसिद्ध सिनेअभिनेत्रीचा हेअरड्रेसर म्हणून काम करीत होता. लवकरच या गुन्ह्यात अन्य काही आरोपींच्या अटकेची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -