घरमुंबईईडीमध्ये जाण्याचा निर्णय तूर्तास तहकूब - शरद पवार

ईडीमध्ये जाण्याचा निर्णय तूर्तास तहकूब – शरद पवार

Subscribe

शरद पवारांच्या ईडी चौकशीच्या भोवती गेलया २ दिवसांपासून राज्यातलं राजकारण फिरत असताना अखेर शरद पवार ईडीच्या कार्यालयात जाणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

आज सकाळपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ईडी चौकशीची चर्चा मुंबईभर आणि महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये होत होती. मात्र, ‘माझ्या कुठल्या कृतीमुळे मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून ईडी कार्यालयात जाण्याचा माझा निर्णय मी तूर्तास तहकूब करत आहे’, अशी भूमिका शरद पवारांनी जाहीर केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून शरद पवारांची ईडी अर्थात अंमलबजावणी संचलनालय चौकशी करणार असल्याची चर्चा सुरू होती. ईडीने राज्य शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये बँकेच्या इतर संचालक आणि पदाधिकाऱ्यांसोबतच शरद पवारांचं देखील नाव समाविष्ट केल्यामुळे त्यांचीही ईडी या प्रकरणी चौकशी करणार असल्याचं बोललं जात होतं.

काय म्हणाले शरद पवार?

ईडीने माझं नाव चार्जशीटमध्ये टाकलं होतं. पुढचा महिनाभर मी महाराष्ट्रभर प्रचारासाठी फिरणार आहे. त्यामुळे त्यादरम्यान जर ईडीने मला बोलावलं, तर मला उपस्थित राहाणं शक्य होणार नाही. त्यामुळेच आत्ता मी ईडीच्या कार्यालयात जाणार होतो. मात्र, ईडीने आवश्यकता लागल्यास पूर्वकल्पना देऊन बोलावलं जाईल, असं आपल्याला कळवलं. त्यादरम्यान मुंबईचे पोलीस आयुक्त आणि सहआयुक्तांनी माझी भेट घेतली. मुंबईत मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा होत होते. त्यासोबतच अनेक कार्यकर्त्यांना मुंबईच्या बाहेरच थांबवण्यात आलं आहे. या परिस्थितीत मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. मी स्वत: गृहमंत्री म्हणून काम केलं आहे. त्यामुळे माझ्या कोणत्याही कृतीमुळे मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय मी तूर्तास स्थगित करतो.

शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

काय घडलं सकाळपासून?

शरद पवार आज दुपारी ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहणार असल्याचं त्यांनीच जाहीर केलं होतं. त्यामुळे सकाळपासूनच मुंबईमध्ये राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी गोळा व्हायला सुरुवात झाली होती. ‘सरकार सूडबुद्धीने कारवाई करत असून पवारांना महाराष्ट्रभरातून मिळत असलेल्या पाठिंब्याची धास्ती घेऊन सरकारने ही कारवाई केली’, अशीच भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून घेतली जात होती. दुपारी २ वाजता शरद पवार ईडीच्या कार्यालयात जाणार होते. मात्र, त्याच्या अर्ध्या तास आधीच ईडीने शरद पवारांना मेल पाठवून ‘सध्या चौकशीची गरज नाही’, असं कळवलं होतं. ‘आम्ही तुम्हाला बोलावलं नाही. तसेच, सध्या तुमच्या चौकशीची आवश्यकता नाही. पुढे जर आवश्यकता पडली, तर आम्ही तुम्हाला त्याची पूर्वकल्पना देऊ’, असं ईडीनं शरद पवारांना पाठवलेल्या मेलमध्ये म्हटलं होतं.

- Advertisement -

हेही वाचा – झाली तर शरद पवारांची चौकशी दिवाळीनंतरच!

दरम्यान, ईडीचा मेल आल्यानंतर देखील शरद पवारांनी ईडीच्या कार्यालयात जाण्याची तयारी केली होती. मात्र, त्यादरम्यान मुंबईचे पोलीस आयुक्त आणि सहआयुक्त यांनी शरद पवारांची भेट घेऊन त्यांना मुंबईतल्या परिस्थितीविषयी माहिती दिली. त्या माहितीच्या आधारावरच शरद पवारांनी ईडी कार्यालयात तूर्तास न जाण्याचा निर्णय जाहीर केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -