घरताज्या घडामोडीराज्यपाल कंगणाला भेटले, पण आमच्या शेतकऱ्यांना भेटले नाहीत - शरद पवार

राज्यपाल कंगणाला भेटले, पण आमच्या शेतकऱ्यांना भेटले नाहीत – शरद पवार

Subscribe

दिल्लीच्या सीमारेषांवर गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी सोमवारी म्हणजेच आज मुंबईच्या आझाद मैदानात राज्याच्या विविध भागांमधून शेतकरी मोठ्या संख्येने जमा झाले असून हे सर्व शेतकरी राजभवनावर मोर्चा नेणार आहेत. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या आंदोलक शेतकऱ्यांना संबोधित केलं. यावेळी शरद पवार यांनी केंद्र सरकारने शेतकऱ्यांविषयी घेतलेल्या अन्यायकारक भूमिकेवर आपली भूमिका मांडली. ‘राज्याच्या राज्यपालांनी शेतकऱ्यांना सामोरं यायला हवं होतं. पण त्यांनी एवढी संवेदना दाखवली नाही. किमान त्यांनी राज्याच्या राजभवनात तरी बसायला हलं होतं. पण तेही त्यांनी केलं नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात असे राज्यपाल कधी पाहिले नाहीत. त्यांच्याविषयी मी अधित काही बोलू इच्छित नाही. देशाच्या केंद्र सरकारने एका अधिवेशनात एकाच दिवशी ३ कायदे आणले आणि तिनही कायदे त्याच दिवशी पारित करावेत असं सांगितलं. चर्चेशिवायच कायदे पारित करून घेतले’, असं पवार यावेळी म्हणाले.

‘हा घटनेचा अपमान आहे’

‘२००३मध्ये कायद्याची चर्चा सुरू झाली. त्यावेळी आमचं कुणाचंही सरकार नव्हतं. ही चर्चा चालू ठेवावी यासाठी मागणी झाली. मी स्वत: देशातल्या राज्यांच्या कृषीमंत्र्यांची बैठक बोलावली आणि कृषी कायद्यासंदर्भातली चर्चा सुरू केली. आमच्या काळात ती चर्चा संपली नाही. भाजपचं राज्य आलं आणि त्या राजवटीत या कायद्याच्या निर्मितीसाठी-अंमलबजावणीसाठी त्यांनी हालचाली सुरू केल्या. चर्चा न करता कायदे पारित केले. एका अधिवेशनात एकाच दिवशी ३ कायदे आणले आणि तिनही कायदे त्याच दिवशी पारित करावेत असं सांगितलं. विरोधकांनी सांगितलं की या कायद्याची चर्चा आम्हाला करायची आहे. पण सरकारने ऐकलं नाही. शेवटी या कायद्याच्या सखोल चौकशीसाठी संसदेच्या सिनेट कमिटीकडे कायदा पाठवण्याची मागणी केली. या कमिटीमध्ये सर्व पक्षांचे लोक असतात. शक्यतो तिथे एकमताने चर्चा होते. शेती कायद्याबाबत हा मार्ग होता. पण केंद्र सरकारने चर्चा नाही, कमिटी नाही अशी भूमिका घेतली. जसाच्या तसा मांडला पाहिजे अशी भूमिका घेतली. चर्चा न करता तिन्ही कायदे पारित झाले म्हणून जाहीर केलं. हा घटनेचा अपमान आहे’, असं शरद पवार यावेळी म्हणाले.

- Advertisement -

‘हा कायदा आणि तुम्ही या दोघांनाही उद्ध्वस्त केल्याशिवाय हा शेतकरी राहणार नाही आणि त्याची सुरुवात आज इथे आझाद मैदानात झाली. तुमच्याशी खेळ खेळण्याचं काम कुणी करत असेल, तर त्याला धडा शिकवण्याचं काम आपल्याला करावं लागेल’, असं देखील शरद पवार यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना सांगितलं.

‘ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांना या देशातल्या शेतकऱ्यांविषयी कवडीची आस्था नाही. ६० दिवसांपासून उन्हातान्हाचा, थंडीचा विचार न करता पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशातला शेतकरी आंदोलनाला बसला आहे. देशाच्या पंतप्रधानांनी त्याची साधी चौकशीही केली नाही. पंजाब म्हणजे काय पाकिस्तान आहे का? स्वातंत्र्याच्या आंदोलनात जबरदस्त किंमत देणारा, जालियनवाला सारखा इतिहास घडवणारा, या भूमीचं रक्षण करणारा आणि १५० कोटींना अन्न पुरवणारा बळीराजा आहे हा. त्याच्याबद्दलची नाकर्तेपणाची भूमिका आज सरकार घेतंय’, असं देखील शरद पवारांनी यावेळी सांगितलं.

Pravin Wadnerehttps://www.mymahanagar.com/author/pravin/
समाजाशी बांधिलकी, बदल घडवण्याची प्रामाणिक इच्छा, त्यासाठी प्रयत्न करण्याची तयारी आणि त्याच तयारीचा एक भाग म्हणून माध्यमांमध्ये प्रवेश. लेखनाची आवड, त्यासाठी वाचनाची निवड. सोबतीला फोटोग्राफीचा छंद, जगण्यासाठी अजून काय पाहिजे?
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -