घरताज्या घडामोडीसोशल मीडियावर निर्बंध घालणारा कायदा रोखणार - शरद पवार

सोशल मीडियावर निर्बंध घालणारा कायदा रोखणार – शरद पवार

Subscribe

नागरिकत्व सुधारणा कायदा नंतर सोशल मीडिया बंदी कायदा करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. तसे केल्यास देशातली तरूण हे सरकार उलथून टाकतील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिला. सोशल मीडिया नकारात्मक वाटत असला तरी त्यावर बंदी आणणे हा उपाय नाही आणि असा प्रयत्न सरकारने केला तर या सरकारच्या विरोधात देशभरातील भाजप विरोधी शक्ती खंबीरपणे उभ्या राहतील, असा इशारा पवार यांनी दिला. अधिवेशना नंतर दोन तीन दिवसात मंत्रीमंडळाचा विस्तार होईल असेही त्यांनी सांगितले.

शरद पवार यांचा केंद्राला इशारा

हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपूर दौऱ्यावर आलेल्या शरद पवार यांनी बुधवारी दुपारी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. सोशल मीडियावर निर्बध घालणारा केंद्र सरकारचा प्रस्तावित कायदा सर्वसामान्य भारतीयांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारा असल्याने या कायद्याला रोखण्यासाठी ठोस कार्यक्रम राबविणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – मुख्यमंत्री झाल्यानंतर मी संयम ठेवायला शिकलो – फडणवीस


‘मोदी सरकारच्या नागरिकत्व सुधारणा कायद्याला देशभरातून विरोध होतो आहे.देशातील अनेक विद्यापीठात नागरिकत्व सुधारणा कायदा विरोधी तरुणांनी जहाल निदर्शने सुरू केली आहेत. १९७७ साली देखील तरुणांनी जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन काँग्रेस सरकार विरोधात बंड पुकारले होते. तरूणांनी उभारलेल्या त्या बंडाचा शेवट सत्तांतर करूनच झाला. त्यामुळे सध्या देशभरात तरुणांच्या मनातील बंडाचे निशाण हे आगामी काळात सत्तांतराची दिशा होऊ शकते’, असा इशारा पवार यांनी स्पष्ट दिला.

- Advertisement -

‘प्रादेशिक पक्ष भाजपला पर्याय निर्माण करतील’

महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या प्रयोगाने प्रादेशिक पातळीवर भाजपसमोर पर्याय निर्माण होऊ शकतो हा संदेश दिला गेला आहे. आगामी काळात भाजपला पर्याय म्हणून प्रादेशिक पातळीवर पक्ष उभे राहतील. तेच एकत्र येऊन भाजपला पर्याय देऊ शकतील, असे मत पवार यांनी व्यक्त केले.

‘स्थानिक पातळीवरही आघाडीचे पर्व’

शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडी आता स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत पोहोचली आहे. शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जिल्हास्तरावरील नेत्यांमध्ये बैठका झाल्या आहेत. जिल्हापरिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत सकारात्मक निर्णय झाल्याची माहिती पवार यांना दिली.


हेही वाचा – बाळासाहेबांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कुबड्या फेकून दिल्या असत्या – फडणवीस


‘उद्धव ठाकरे योग्य ‘ट्रॅक’वर’

जामिया मिलिया विद्यापीठात शिकणाऱ्या मुलांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीची तुलना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जालियनवाला बागेशी केल्याकडे लक्ष वेधत असता, सर्व योग्य ‘ट्रॅक’वर असल्याचे मार्मिक उत्तर पवार यांनी दिले.

‘अधिवेशनानंतर दोन-तीन दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार’

हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर दोन-तीन दिवसांत राज्यातील महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे शरद पवार यांनी सांगितले. मंत्रिमंडळ विस्तार, शेतकरी कर्जमाफी, राज्याची आर्थिक परिस्थिती आदी विषयांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत लवकरच बैठक होणार असून, त्यानंतर पुढील निर्णय होतील, असे पवार यांनी सांगितले. एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चेबाबत विचारले असता, त्यावर थेट उत्तर न देता, खडसे आपल्याला भेटायला येणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -