राज ठाकरे यांच्या ‘भावी मुख्यमंत्री’च्या बॅनर्सवर पत्नी शर्मिला ठाकरे म्हणाल्या…

राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंच्या एका नव्या वक्तव्यानं या चर्चांना आणखी हवा मिळाली आहे.

Raj Thackeray

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुढीपाडव्यानिमित्त बुधवारी जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी माहिमधील मजारींचा मुद्दा मांडला आणि दुसऱ्याच दिवशी त्यावर कारवाई देखील झाली. आज सकाळीच माहिमधील अनधिकृत बांधकामांवर बुलडोजर फिरवण्यात आला. राज ठाकरेंच्या एका इशाऱ्यावर लागलीच झालेल्या कारवाईनंतर आता शिवाजी पार्क परिसरात तसेच शिवसेना भवन परिसरात मनसेने मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी केली आहे. ‘महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री राज ठाकरे’ अशा आशयाचा उल्लेख या बॅनरवर करण्यात आला आहे. त्यामुळे या बॅनरची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. अशात आता राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंच्या एका नव्या वक्तव्यानं या चर्चांना आणखी हवा मिळाली आहे.

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर सभेला २४ तासही पूर्ण झाले नाहीत तोवर माहिममधील मजारींवर कारवाई देखील पूर्ण झाल्यानं आज मनसैनिकांमध्ये उत्साह पहायला मिळतोय. या बॅनर्समुळे राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत मनसेकडून राज ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून सादर केले जाणार का? अशी चर्चाही या निमित्ताने रंगली आहे. यावर राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना माध्यमांनी सवाल उपस्थित केले. त्यावर उत्तर देताना शर्मिला ठाकरेंनीही या मताला दुजोरा दिलाय.

यावेळी बोलताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, प्रत्येक वेळेला कुठल्याही सामान्यातील सामान्य माणसालाही अडचण येते तेव्हा ते राज ठाकरेंकडे येतात. यापूर्वी कृष्णकुंजवर यायचे, आता शिवतिर्थवर येतात. मला वाटतं आमच्यासाठी ती पोजिशन खूप मोठीय, त्यामुळे लोकांच्या मनातील मुख्यमंत्री ते आहेत, असे शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं. तसेच, त्यांनी जी ब्लू प्रिंट तयार केलीय, ती पूर्ण करण्यासाठी त्यांना मुख्यमंत्री व्हायला लागेल, असेही शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं.
तसंच राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरेनीही यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय. राज ठाकरे हे आधीपासूनच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री होते आणि यापुढेही राहणार आहेत, असं म्हणत अमित ठाकरे यांनी आपल्या वडिलांच्या कामगिरीचं कौतूक केलंय.