(Sharmistha Mukherjee Vs Congress) नवी दिल्ली : माजी पंतप्रधान दिवंगत डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मारकावरून काँग्रेसवर टीकास्त्र सोडणाऱ्या माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जी या पुन्हा एकदा काँग्रेसवर भडकल्या आहेत. एवढेच नव्हे तर, काँग्रेसची पाठराखण करणाऱ्या आपल्या भावाला देखील त्यांनी फटकारले आहे. काँग्रेसने यापूर्वी आपल्या वडिलांचा ‘संघी’ असा उल्लेख केल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला आहे. (Pranab Mukherjee’s daughter criticizes Congress again)
शर्मिष्ठा मुखर्जी यांनी सोमवारी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. माझे वडिलांनी जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) भेट दिली तेव्हा, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भक्त-चेल्यांनी त्यांना ‘संघी’ असे संबोधले. आईने (खासदार सोनिया गांधी) ज्यांचा उल्लेख ‘मौत का सौदागर’ असा केला होता, त्यांना राहुल गांधी यांनी संसदेत मिठी का मारली? याबदद्ल याच भक्त-चेल्यांनी राहुल गांधी यांना जाब विचारावा, असे आव्हान शर्मिष्ठा मुखर्जी यांनी दिले आहे. त्यांच्या टुकार तर्कानुसार तेसुद्धा मोदी यांचे साथीदार झाले ना? असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
Rahul’s Bhakt-chelas who call my father ‘Sanghi’ for his RSS visit, I dare them to question their leader on why did he hug @narendramodi in parliament whom his mother called ‘maut ka saudagar’? By their convoluted logic, Rahul then should be seen as his accomplice.
— Sharmistha Mukherjee (@Sharmistha_GK) December 30, 2024
शर्मिष्ठा मुखर्जी यांनी आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. मूर्ख आणि भाटगिरी करणाऱ्या टोळीच्या मदतीने काँग्रेसला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करत असल्याबद्दल राहुल गांधी यांना शुभेच्छा! तुम्ही आपली ‘नफरत की दुकान’ चालवा. मला काही फरक पडत नाही, असे त्यांनी सुनावले आहे.
काँग्रेसची पाठराखण करणारा आपला भाऊ अभिजित मुखर्जी यांच्यावरही शर्मिष्ठा मुखर्जी यांनी निशाणा साधला आहे. 2020मध्ये जेव्हा माझ्या वडिलांचा (प्रणव मुखर्जी) मृत्यू झाला तेव्हा काँग्रेस नेतृत्वाने शोकसभादेखील आयोजित केली नव्हती किंवा काँग्रेस कार्यकारिणीची (CWC) बैठक बोलावली नाही. उलट याबाबत काँग्रेस नेतृत्वाने आपली दिशाभूल केल्याचा आरोप शर्मिष्ठा मुखर्जी यांनी यापूर्वी केला होता. त्यावर, मनमोहन सिंग यांच्या निधनावरून कोणताही वाद होऊ नये, असे अभिजीत मुखर्जी यांनी म्हटले होते.
आपल्या बहिणीच्या आरोपाला उत्तर देताना अभिजित मुखर्जी म्हणाले की, 2020मध्ये प्रणव मुखर्जी यांचे निधन झाले, तेव्हा कोविड-19 निर्बंध लागू होते. त्यावेळी काँग्रेसला एक रॅलीसुद्धा काढायची होती, पण कोविड-19मुळे ते तसे करू शकले नाहीत. पण काँग्रेसच्या नेत्यांनी घरी येऊन आपली भेट घेतली. अगदी पंतप्रधान मोदी, राहुल गांधी आणि वरिष्ठ नेते आले होते, असे अभिजीत मुखर्जी यांनी म्हटले आहे.
पण त्याला शर्मिष्ठा मुख्रजी यांनी एका पोस्ट द्वारे प्रत्युत्तर दिले आहे. ज्या पक्षाचे समर्थक आपल्या वडिलांबद्दल दिवसरात्र अतिशय घृणास्पद रीतीने अपशब्द वापरतात, त्या पक्षात पुन्हा सामील होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीची लाज वाटते, असे त्यांनी सुनावले आहे. कोविड पॉझिटिव्ह आढळल्यानंतर 2020मध्ये प्रणव मुखर्जी यांचे वयाच्या 84व्या वर्षी निधन झाले होते, हे उल्लेखनीय. (Sharmistha Mukherjee Vs Congress: Pranab Mukherjee’s daughter criticizes Congress again)
हेही वाचा – Santosh Deshmukh Murder : बीड प्रकरणावरून महाराष्ट्र तापलेला अन् अजित पवार थंड हवेच्या देशात